ई-पीक पाहणीच्या अडचणी सोडवा; जुन्नर तहसीलदारांना मागण्यांसाठी निवेदन | पुढारी

ई-पीक पाहणीच्या अडचणी सोडवा; जुन्नर तहसीलदारांना मागण्यांसाठी निवेदन

नारायणगाव(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यात ई-पीक पाहणी करताना शेतकर्‍यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतकर्‍यांना नेटवर्कचा अडथळा येत असल्याने ज्या शेतकर्‍यांचा पीक पेर्‍याची नोंद होणार नाही त्या ठिकाणी तलाठी यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी लावून द्यावी व गाव कामगार तलाठ्याने शेतकर्‍यांनाही ई-पीक पाहणीचे प्रशिक्षण देणे व जनजागृती करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर तलाठी व कोतवाल यांनी जाऊन संबंधित शेतकर्‍यांच्या पीक पेर्‍याची नोंद घालून द्यावी. कुठल्या शासकीय लाभापासून एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जुन्नर तालुका युवा अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी केली.

जुन्नर नगरपालिका हद्दीतील मलमिश्रित पाण्याची व दुर्गंधीयुक्त सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. गेली अनेक वर्षे जुन्नर नगरपालिका हद्दीतील दुर्गंधीयुक्त पाणी कुकडी नदीमध्ये सोडण्यात येते. त्या सांडपाण्याचा घातक परिणाम मानव, पाळीव प्राण्यांवर, पिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. नदीवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना असून, ते पाणी वाड्या-वस्त्यांवर नळाद्वारे ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्यामार्फत पिण्यासाठी पाणी पुरविले जाते.

मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेट देऊन खातरजमा केली असता कॅन्सरसारखे आजारांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. शेतकर्‍यांना वेळोवेळी पाणी उपसा करताना कृषी पंपासाठी पाण्यात उतरावे लागते. तेव्हा शेतकर्‍यांच्या पायाला पुरळ येणे आणि त्वचारोगाचा गंभीर आजार असल्याचे निदर्शनास आले. ते बरे करण्यासाठी सर्वसाधारण शेतकर्‍यांना, ग्रामस्थांना, तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड बसून काहींना कायमचे अपंगत्वसुद्धा आलेले आहे.

या सर्वातून मार्ग काढण्यासाठी नगरपालिकेने सदर दूषित पाण्याची विल्हेवाट योग्यरीत्या लावावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चंद्रभागा नमाम योजना, केंद्रीय पेयजल योजनेअंतर्गत, नगरपालिका विकास खात्यांतर्गत हा प्रश्न सुटू शकतो, अशा मागण्या शेतकरी संघटना जुन्नर तालुका यांच्या वतीने करण्यात आल्या.

मागण्यांचा विचार तहसीलदार जुन्नर व नगरपालिका जुन्नर यांनी केला नाही, तर तीव्र आंदोलन संघटनेच्या वतीने तहसीलदार कचेरीसमोर करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा नेते अंबादास हांडे व जुन्नर तालुकाध्यक्ष संजय भुजबळ, जुन्नर युवा आघाडीचे उपाध्यक्ष सचिन थोरवे यांनी दिला आहे.

Back to top button