पुणे : दहा रस्त्यांचे रूपडे पालटणार; जी- 20 च्या धर्तीवर होणार सुशोभीकरण | पुढारी

पुणे : दहा रस्त्यांचे रूपडे पालटणार; जी- 20 च्या धर्तीवर होणार सुशोभीकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जी 20 परिषदेसाठी ज्या पद्धतीने विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यात आले. त्याच धर्तीवर शहरातील महत्त्वाच्या 10 रस्त्यांचेही सुशोभीकरण करण्यात येणार आहे, पालिका हद्द सुरू होणार्‍या ठिकाणी नामफलक लावणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली. शहरात जी-20 परिषदेसाठी महापालिकेने शहरातील विविध रस्त्यांचे व चौकांचे सुशोभीकरण केले.

रस्त्यांवर शोभेची झाडे, खड्डे दुरुस्ती, वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी पट्टे आणि वाहतूक चिन्ह, पदपथ व रस्ता दुभाजकाची रंगरंगोटी आदी कामे करण्यात आली. यामध्ये विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील 10 रस्त्यांचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेकडून हाती घेतले जाणार आहे. या रस्त्यांवर पुन्हा खोदाई होणार नाही, याची दक्षता घेण्यासोबतच डांबरीकरण, रस्ते दुभाजकांची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.

शहरात येणार्‍या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य
नगर रोड, सातारा रोड, सोलापूर रोड, पुणे-मुंबई जुना हायवे रोड, सिंहगड रोड, मगरपट्टा ते चंदननगर बायपास आदींसह एकूण दहा रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. यामध्ये दुभाजकांची दुरुस्ती, खड्डे भरणे, झेब—ा क्रॉसिंग, मध्यभागी असलेल्या पट्ट्या रंगविणे, साईन बोर्ड लावणे आदी कामे केली जाणार आहेत. तसेच महापालिकेची हद्द सुरू होताना स्वागत करणारा आणि संपताना धन्यवाद मानणारा नामफलक लावण्यात येणार आहे.

महापालिकेची हद्द ज्या ठिकाणावरून सुरू होते अशा ठिकाणी बोर्ड लावण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकानी सुशोभीकरणदेखील करण्यात येईल. रस्त्यावर झाडे लावण्यात येणार असून, शहर अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक तरतूद महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध आहे.

                                      – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Back to top button