येरवडा परिसरात दगडफेक; कोयते हवेत फिरवले, बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या | पुढारी

येरवडा परिसरात दगडफेक; कोयते हवेत फिरवले, बिअरच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पूर्ववैमनस्यातून येरवड्यात दोन टोळक्यांनी लक्ष्मीनगर भागात तुफान दगडफेक करून बिअरच्या बाटल्या घरावर, रस्त्यावर फोडून राडा केला. तरुणांनी हातात तलवारी, कोयते नाचवत परिसरात दहशत निर्माण करून एकाच्या डोक्यात कोयता मारून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. टोळक्यांनी केलेल्या दगडफेकीत रस्त्यावर उभारलेल्या अनेक रिक्षा आणि दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. येरवड्यातील परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये गजराज चौकात हा प्रकार घडला.

अब्दुल्ला आमीरउल्ला खान (वय 19, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे, दहशत माजविणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. फिर्यादी खान याचा मोबाईल गहाळ झाला होता. मित्र महेश मिश्रा आणि आयुष यांना सोबत घेऊन ते शनिवारी रात्री येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले होते. रात्री अकराच्या सुमारास तक्रार देऊन तिघे दुचाकीवरून घरी येत होते.

गजराज हेल्थ क्लबसमोरून जात असताना ओळखीचे अंश पुंडे ऊर्फ आनशा, सुरेश कुडे ऊर्फ ममड्या, नाग्या आणि यश पात्रे ऊर्फ काळ्या (सर्व. रा. भीमज्योत मित्रमंडळ, येरवडा) यांनी दुचाकीवरून पाठलाग सुरू केला. त्या वेळी खान याची दुचाकी घसरून तिघे खाली पडले. सर्व अल्पवयीन मुले त्याच्याजवळ आले. त्या वेळी आनशा नावाच्या मुलाने आज सोडायचे नाही, असे बोलून त्याच्या हातातील कोयत्याने जिवे मारण्याचे उद्देशाने खान याच्या डोक्यात दोन वेळा वार करून जखमी केले.

त्यानंतर उर्वरित तीन अल्पवयीन मुलांनी खान याला लाकडी बांबूने जबर मारहाण केली. खान याच्यासोबत असलेल्या मिश्रा याला ममड्याने लाकडाने बेदम मारहाण केली. जीव वाचवून खान याने जखमी अवस्थेत थेट येरवडा पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. खान याला मारहाण केल्याचे समजताच दोन टोळक्यांनी एकमेकांवर आणि परिसरातील घरांवर, रस्त्यावर तुफान दगडफेक करून बिअरच्या बाटल्या फोडल्या. यामुळे संतोष मित्रमंडळ आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.

सराईतासह दोघांना अटक
घरात शिरून तरुणासह मित्राला बेदम मारहाण करीत 20 हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात ऑनलाइन वर्ग करून घेत कार चोरी करून नेणार्‍या एका सराईतासह दोन चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली. रोहन रवींद्र गायकवाड (वय 24, रा. सणसवाडी, शिरूर) आणि निहाल ऊर्फ मनोज नागनाथ गायकवाड (वय 27, रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सचिन गायकवाड (वय 24, रा. वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 29 जानेवारीला वडगाव शेरीतील साईनाथनगरमध्ये घडली होती.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलिस उपनिरीक्षक अरविंद उमरे यांच्या पथकाने केली.

तीन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींवर गुन्हा
सदर गुन्ह्यात येरवडा पोलिसांकडे 17 वर्षीय मुलाने विरोधी तक्रार दिली आहे. त्यानुसार तीन अल्पवयीन मुलांसह पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद प्रमोद इंगळे (वय-27) व विवेक प्रकाश गवळी (20) यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

पूर्ववैमनस्यातून लक्ष्मीनगर भागात शनिवारी रात्री दोन गटांत भांडणे झाली. टोळक्यांनी परिसरात दगडफेक करून दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडून हत्यारे नाचवत परिसरात दहशत निर्माण केली. मारहाण करणारी सर्व मुले अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत.

                       किशोर जाधव, सहायक पोलिस आयुक्त, येरवडा विभाग

 

Back to top button