बारामती : कसब्यातील त्या चोरीमागे अल्पवयीन मुलीचा हात ; शहर पोलिसांनी लावला छडा

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शहरातील कसबा भागात रोख रकमेसह दागिने असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याच्या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेत चोरीचा छडा लावला. तिने हे दागिने तिच्या मित्राकडे ठेवण्यासाठी दिले होते. शहरातील कसबा भागात अश्विनी मकरंद शिर्के यांच्या सदनिकेत ही चोरी झाली होती. फिर्यादी या घराबाहेर कुलूप लावून गेल्या असताना पाठीमागील बाजूच्या गॅलरीतून प्रवेश करत य मुलीने भर दिवसा ही चोरी केली होती. या घटनेत ५८ हजार रुपयांच्या रोख रकमेसह सोन्या, चांदीचे दागिने असा सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीला गेला होता. शिर्के यांनी या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. पुढील बाजूच्या दरवाजाला लावलेले कुलूप जसेच्या तसे होते. गॅलरीतून प्रवेश करत ही चोरी झाली होती. शेजारी राहणाऱया एका अल्पवयीन मुलीनेच गॅलरीतून आत प्रवेश करत हात साफ केल्याचे दिसून आले. पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेत कौशल्याने तपास केला. त्यावेळी तिने हे दागिने मित्राकडे ठेवण्यासाठी दिल्याचे दिसून आले.
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सपोनि कुलदीप संकपाळ, हवालदार रामचंद्र शिंदे, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, तुषार चव्हाण, दशरथ इंगोले, अक्षय सिताप, सागर जामदार, शाहू राणे, तानाजी गोरे यांनी ही कामगिरी केली.
घरफोडीच्या प्रकरणांचा तपास करताना तक्रारदाराचा निष्काळजीपणा अनेकदा समोर आला आहे. घराचा पाठीमागील दरवाजा उघडा ठेवणे, गॅलरीच्या दरवाजाला कुलुप न घालणे, घराची चावी इतर कोणाला देणे या मुळे अशा चोऱया होतात. त्यासाठी गॅलरीला ग्रील असावे. मुख्य दरवाजाबाहेर संरक्षक दरवाजा असावा. बाहेर पडताना कुलुप व्यवस्थित लावल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
– सुनील महाडीक, पोलिस निरीक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे