पिंपरी : सांडपाणी थेट पालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडण्यात आल्याने महापालिकेच्या सहा कंपन्यांवर कारवाई | पुढारी

पिंपरी : सांडपाणी थेट पालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडण्यात आल्याने महापालिकेच्या सहा कंपन्यांवर कारवाई

पिंपरी : कंपन्यांमध्ये तयार होणार्‍या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते सांडपाणी थेट पालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडण्यात आले. ते सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत मिसळत असल्याने जलप्रदूषणात भर पडल्याने पालिकेच्या ड्रेनेज (जलनिस्सारण) विभागाने सहा खासगी कंपन्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे गुन्हा नोंदविला आहे.  इंद्रायणी नदी परिसरातील एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात कंपन्या, उद्योग व लघुउद्योग आहेत. अनेक कंपन्या व उद्योग रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यास सोडून देतात. अशा काही कंपन्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी कारवाई केली आहे. मात्र, थेट नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार काही थांबलेले नाही.

नदीत रंगीत सांडपाणी मिसळत असल्याच्या तक्रारी पालिकेस प्राप्त झाल्या. त्यानुसार ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर महाजन, कनिष्ठ अभियंता स्वामी जंगम यांच्या पथकाने परिसरातील ड्रेनेजलाइनची पाहणी केली. त्यात सहा कंपन्यांनी पालिकेच्या ड्रेनेज लाइनला कंपन्यांची सांडपाणी वाहिनी जोडल्याचे आढळून आले. ड्रेनेज लाइनमधून कंपन्या, उद्योग व लघुउद्योगाचे रासायनिक सांडपाणी सोडण्यास मनाई आहे. त्यामुळे पालिकेने या कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदविला. मारूती लोंढे (क्लालिटी कोटिंग वर्क्स, शेलार वस्ती), कुमार मोहन प्रजापती (डायनामिक प्लास्टिक इंडस्ट्रीज), मोरेश्वर मुंगसे (ओम इंडस्ट्रीज), सचिन साठे (वरद इन्फोटेक), सुरेश अग्रवाल (हरिदर्शन प्रा. लि.) आणि विश्वेश देशपांडे (टेक्सेव्ही मॅकेनिकल) या कंपन्यांवर गुन्हा दाखल केला.

Back to top button