पिंपरी : पाच जणांना न्यायालयीन कोठडी

पिंपरी : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक कारवाई करण्यासाठी आले असताना पुरावे नष्ट केल्याच्या कारणावरुन दि. सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. अमर मूलचंदानी यांचे 2 भाऊ आणि पुतण्या यांच्यासह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, त्यांना रविवारी पिंपरी येथील सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणी अशोक साधुराम मुलचंदानी, मनोहर साधुराम मुलचंदानी, सागर मनोहर मुलचंदानी, दया अशोक मुलचंदानी आणि साधना मनोहर मुलचंदानी यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, त्यांना पिंपरी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी नाकारुन न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणात ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष अॅड. मूलचंदानी यांच्या पिंपरी येथील घर आणि कार्यालयावर ईडीच्या पथकाने शुक्रवारी (दि. 27) छापा मारला. या कारवाईदरम्यान सरकारी कामात अडथळा आणणे, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिली.
दि. सेवा विकास सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालकांनी नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरित केले. त्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणात यापूर्वी काही जणांना अटकही केली होती. या प्रकरणात अमर मूलचंदानी हे काही महिन्यांपूर्वी जामीनावर बाहेर आले आहेत. त्यांच्या घर आणि कार्यालयाची शुक्रवारी ईडीच्या पथकाने कसून तपासणी केली. दरम्यान, अमर मूलचंदानी हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुरुवातीला वायसीएममध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) रुपाली बोबडे करीत आहेत.