पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

पिंपरी : श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून भक्तगण येतील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा :  संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे मंदिर पहाण्यासाठी व दर्शनासाठी महाराष्ट्रासह देशातील भक्तगण भंडारा डोंगर येथे येतील. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी लागणारी मदत मी वैयक्तिक व शासनाच्या माध्यमातून देईन, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी दिली.  संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील नियोजित मंदिराच्या कामाची पाहणी करण्यास व दशमी सप्ताहास भेट देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे रविवार (दि. 29) आले असताना बोलत होते. या वेळी खा. श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट, माजी आमदार विलास लांडे, मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हभप साहेबराव काशीद, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, विठ्ठल शिंदे, गुलाब म्हाळस्कर, किशोर आवारे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, सदाशिव म्हाळस्कर, संदीप काशीद आदींसह भक्तगण व नागरिक उपस्थित होते.

‘साक्षात संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या दर्शनासाठी या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज आले होते, त्या ठिकाणी येण्याचे मला भाग्य लाभले त्याबद्दल मी स्वत:ला धान्य मानतो, हा भंडारा डोंगर एक वेगळ्या उर्जेने भरला असल्याने या श्रध्दास्थानाची श्रध्दा कायम रहावी म्हणून नियोजित रिंगरोड या पवित्र भूमीच्या बाजूने घेतला  असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. श्री संत तुकाराम महारांची कर्मभूमी भंडारा डोंगर आहे, या ठिकाणी भव्य मंदिर उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प साहेबराव काशीद यांनी व्यक्त केली. तर राज्य निर्मिती नंतर पहिला मुख्यमंत्री भंडारा डोंगर येथे आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी स्वागत प्रस्ताविक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प साहेबराव काशीद यांनी केले, सूत्रसंचलन माजी मंत्री बाळा भेगडे, गुलाब वाघोले यांनी केले. आभार बापूसाहेब भेगडे यांनी केले.

Back to top button