पुणे : टोमॅटो, काकडी, फ्लॉवर स्वस्त; फळभाज्यांची आवक स्थिर | पुढारी

पुणे : टोमॅटो, काकडी, फ्लॉवर स्वस्त; फळभाज्यांची आवक स्थिर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात रविवारी फळभाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत स्थिर राहिली. लिंबू विक्रेत्यांनी मार्केट यार्डच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केल्याने फळभाज्यांमध्ये टोमॅटो, काकडी, फ्लॉवरला उठाव कमी राहिला. परिणामी, त्यांच्या भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली. आग्रा येथील बटाटा, तर पंजाब येथील मटारचा हंगाम संपल्याने येथून होणारी आवक बंद झाली आहे. परिणामी, मटारची आवक निम्म्यावर आली आहे.

आवकच्या तुलनेत मागणी कायम राहिल्याने मटराचे दर टिकून होते. रविवारी तरकारी विभागात पुणे विभाग तसेच राज्यासह परराज्यातून 100 ते 110 ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ती स्थिर राहिली. फळभाज्यांची आवक-जावक कायम राहिल्याने बहुतांश भाज्यांचे दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये बेंगलोर येथून 2 टेम्पो आले, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून सुमारे 7 ते 8 टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, गुजरात येथून 2 टेम्पो भुईमूग शेंग, कर्नाटक येथून 3 ते 4 टेम्पो घेवडा, पावटा 2 ते 3 टेम्पो, तोतापुरी कैरी 150 क्रेटस्, कर्नाटक व गुजरात येथून 3 ते 4 टेम्पो कोबी, राजस्थान येथून 9 ते 10 ट्रक गाजर, मध्य प्रदेश येथून 15 ते 16 ट्रक वाटाणा, तर मध्य प्रदेशातून लसणाची 9 ते 10 ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 1100 ते 1200 पोती, टोमॅटो 9 ते 10 हजार क्रेटस्, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 5 ते 6 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 100 ट्रक यांसह इंदौर व स्थानिक भागातून बटाटयाची 40 ट्रक इतकी आवक झाली.

Back to top button