पुणे : गव्हाच्या दरवाढीला ब्रेक; खाद्यतेल उतरले | पुढारी

पुणे : गव्हाच्या दरवाढीला ब्रेक; खाद्यतेल उतरले

पुणे : महिनाअखेर असल्यामुळे येथील घाऊक बाजारात गेल्या आठवड्यात उलाढाल मंदावली होती. मागणीअभावी खाद्यतेलांमधील घसरण सुरूच असून, गेल्या आठवड्यातही दर आणखी घसरले. केंद्र सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री करण्याचे घोषित केल्यामुळे गव्हाची दरवाढ थांबली असून, दरात 100 रुपयांनी घट झाली. मात्र,आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे गुळाचे दर तेजीतच असल्याचे सांगण्यात आले.

तुटवडा निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गव्हाचे दर सातत्याने वाढत होते. या दरवाढीची दखल घेऊन केंद्र सरकारने तीस लाख टन गहू खुल्या बाजारात उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. यामुळे दरवाढ थांबून हलक्या प्रतीच्या – मिलबर गव्हाच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी घट झाली. गुजरातमधील सौराष्ट्र भागात नव्या गव्हाची तुरळक प्रमाणात आवक सुरु झाली असून, येत्या 15 दिवसांत नियमित आवक सुरु होईल. त्यानंतर अन्य राज्यांतूनही नव्या गव्हाची आवक अपेक्षित आहे.

यामुळेदेखील गव्हाची दरवाढ थांबल्याचे सांगण्यात आले. खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आंतरराष्ट्रीय बाजारात आवक मुबलक असून, मागणी कमी असल्यामुळे सुर्यफूल, पामोलिन, तसेच सोयाबीन तेलाचे दर सातत्याने घसरत आहेत. गेल्या आठवड्यातही या सर्व खाद्यतेलांच्या दरात टनामागे आणखी 40 ते 50 डॉलर्संनी घट झाली. याचा परिणाम म्हणून तसेच मागणीचा अभाव असल्यामुळे येथील घाऊक बाजारातही सोयाबीन, सुर्यफूल, पामोलिन तेलाच्या दरात 15 किलोमागे आणखी 30 ते 40 रुपयांनी घट झाली. वनस्पती तुपाचे दरही 25 रुपयांनी कमी झाले.

शेंगदाणा आणखी महागला :
निर्यातीमुळे शेंगदाण्याचा तुटवडा निर्माण झाला असूनत दर सातत्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यातही सर्व प्रकारच्या शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी 200 ते 300 रुपयांनी वाढ झाली. घाऊक बाजारात शेंगदाण्याचे दर 125 रुपयांपर्यंत किरकोळ बाजारात प्रतिकिलोचा दर 140 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) 3450-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2620-2720, रिफाईंड तेल ः 2475-3000, सरकी तेल 1800-2100, सोयाबीन तेल 1750-2000, पामतेल 1400-1650, सूर्यफुल रिफाईंड तेल 1800-2050, वनस्पती तूप 1380-1880, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसुरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509-8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु.

गहू :- सौराष्ट्र लोकवन नं. 1 3900-4200, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3500-3800, एम.पी. लोकवन 3300-3600, सिहोर नं. 1 5000-5600, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3600-4200, मिलबर 3200 रु. शेंगदाणा :- जाडा 11500-12500, स्पॅनिश – 12500, घुंगरू 12000-12100, टीजे 10700-10800 रु. गूळ :- गूळ एकस्ट्रा 3800-4100, गूळ नं. 1 3500-3700, गूळ नं. 2 3250-3400, गूळ नं.3 3000-3200, बॉक्स पॅकिंग 3400-4700 रु. डाळी :- तूरडाळ 1000-11000, हरभराडाळ 5800-5900, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7600-7700, मटकीडाळ 9800-10000, उडीदडाळ 8000-10000 रु.

आवक कमी असल्याने गूळ तेजीत
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाल्यामुळे गूळ उत्पादकांना ऊसाची कमतरता जाणवत आहे. यामुळे सध्या गुळाचे उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. अन्य राज्यातही थोडयाफार प्रमाणात हीच स्थिती आहे. यामुळे ऐन हंगामातच गुळाचे दर वाढू लागले आहेत. अन्य राज्यांततूनही महाराष्ट्रातील गुळास चांगली मागणी आहे. यामुळे गेल्या आठवडयातही गुळाच्या दरात क्विंटलमागे आणखी 100 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

Back to top button