बटाटा काढणी अंतिम टप्प्यात; बाजार भावातील घसरण, शेतकरीवर्गात नाराजी | पुढारी

बटाटा काढणी अंतिम टप्प्यात; बाजार भावातील घसरण, शेतकरीवर्गात नाराजी

पारगाव(ता .आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा बटाट्याला समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही. त्यामुळे बटाटा उत्पादकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सध्या दहा किलोला 140 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. बाजारभावात झालेल्या घसरणीमुळे बटाटा उत्पादक अडचणीत आला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सध्या बटाटा काढण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

बाजारभाव निश्चित वाढेल, या आशेने बहुतांशी शेतकर्‍यांनी बटाटा पीक पुन्हा घेतले. परंतु, मागास बटाट्याच्या पिकालादेखील बाजारभावाची साथ मिळाली नसल्याने बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे बटाटा पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसूल झाले नाही. सध्या बटाटा पिकाला दहा किलोला 140 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. यंदा बटाटा गळीतामध्ये देखील मोठी घट झाली आहे. ढगाळ हवामान, थंडीचे कमी- अधिक प्रमाण यामुळे बटाट्याची फुगवण समाधानकारक झालेली नाही. बाजारभाव कमी आणि गळीतामध्ये घट यामुळे बटाटा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Back to top button