आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पडले दाट धुके; शेतकऱ्यांची चिंता वाढली | पुढारी

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पडले दाट धुके; शेतकऱ्यांची चिंता वाढली

पारगाव (ता.आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा :  तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (दि. ३०) सकाळी दाट धुके पडले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. रब्बी हंगामातील गहू , हरभरा, कांदे या पिकांवर दाट धुक्याचा परिणाम होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, काठापुर, वळती, नागापूर, रांजणी आदी परिसरात गेले तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाले आहे.

दिवस उजाडल्यानंतर देखील उशिरापर्यंत हे धुके कायम होते. त्यामुळे वाहनांना दिवे लावून प्रवास करावा लागला. या दूषित वातावरणामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीपासून ढगाळ हवामान त्यातच आता दाट धुक्याची भर पडल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदे या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या कांदा पिक- दीड महिन्याचे झाले आहे. गव्हाचे पीक देखील ओंबीवर आले आहे. हरभऱ्याचे पीक फुलोऱ्यात आले आहे. परंतु आता वातावरण दूषित झाल्याने या पिकांवर विविध रोगराईंचा प्रादुर्भाव होणार आहे.

Back to top button