जि.प. शाळेतील जीर्ण झाडांचा विद्यार्थ्यांना धोका; सराव सुरू असताना फांद्या आवारात कोसळल्या | पुढारी

जि.प. शाळेतील जीर्ण झाडांचा विद्यार्थ्यांना धोका; सराव सुरू असताना फांद्या आवारात कोसळल्या

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरातील नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्या धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांवर दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. प्रजासत्ताक दिनासाठी नुकताच विद्यार्थ्यांचा लेझीम खेळाचा सराव सुरू असताना अचानक जीर्ण झाडांच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने त्या वेळी विद्यार्थी एका बाजूला असल्याने दुर्घटना टळली.

दरम्यान, ही जीर्ण झाडे काढण्यावरून प्रशासनात टोलवाटोलवी सुरू आहे. महापालिकेत नांदेड गावाचा समावेश झाला आहे. मात्र, अद्यापही या प्राथमिक शाळेचे जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतर झालेले नसल्याने जीर्ण झाडे काढता येत नाहीत, त्यामुळे याबाबत पीएमआरडीएने कार्यवाही करावी, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले म्हणाले की, शाळेची इमारत शंभर वर्षांपूर्वीची आहे. अनेक झाडे साठ-सत्तर वर्षांपूर्वीची असून, त्यातील काही जीर्ण होऊन कोसळण्याच्या स्थितीत आहेत. अनेक महिन्यांपासून झाडांच्या फांद्या कोसळत आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.

नांदेड येथील शाळेचे महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आलेले नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोकादायक झाडे काढण्याबाबत पीएमआरडीएला कळविण्यात आले आहे.
                                               – प्रदीप आव्हाड, सहायक आयुक्त,
                                                   सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय.

शाळेच्या आवारात नुकताच दुपारी विद्यार्थी लेझीम खेळाचा सराव करत होते. त्या वेळी अचानक मोठ्या झाडाच्या फांद्या कोसळल्या. सुदैवाने तेथे विद्यार्थी नव्हते. त्यामुळे दुर्घटना घडली नाही. परिसरातील सर्व जीर्ण झाडे काढणे आवश्यक आहे.
                                                                     – रमेश बागुल,
                                                 मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, नांदेड.

Back to top button