‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेंची थाटात मिरवणूक; राजगुरुनगरला फटाक्यांची आतषबाजी | पुढारी

‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षेंची थाटात मिरवणूक; राजगुरुनगरला फटाक्यांची आतषबाजी

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकाविणारे शिवराज काळुराम राक्षे यांची राक्षेवाडी ते राजगुरुनगर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी, पारंपरिक ढोल-ताशांचा दणदणाट, घोड्यांचा डान्स, गाण्यावर थिरकणारे हजारो तरुण हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. राज्यासह जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी या वेळी हजेरी लावली. मिरवणुकीत राक्षेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

शिवराज राक्षे यांची मिरवणूक रविवारी (दि. 29) राक्षेवाडी गावचे ग्रामदैवत वाघोबा महाराजांच्या मंदिरापासून सुरू झाली. नाशिक महामार्ग, राजगुरुनगर शहरातून ते बाजार समिती मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. नाशिक महामार्गावरील हुतात्मा स्मृती शिल्पस्थळातील हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना व शिवसेना कार्यालयाबाहेरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवराज यांनी अभिवादन केले. मिरवणुकीमुळे नाशिक महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नाने ती पुन्हा सुरळीत झाली. शिवराजची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने नागरिकांची अक्षरशः तुफान गर्दी झाली होती. बाजार समिती मैदानावर मिरवणुकीची सांगता झाली. तेथे त्याचा सत्कार सोहळा पार पडला.

शिवराजला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचा फोटो काढण्यासाठी तरुण-तरुणींसह नागरिकांची झुंबड उडाली होती. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे, जितेंद्र राक्षे, माजी सभापती शांताराम चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, उपसरपंच मच्छिंद्र राक्षे, पोलिस पाटील पप्पूकाका राक्षे, सरपंच सुरेखा राक्षे, माजी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी राक्षे, स्नेहल राक्षे, माजी सरपंच विद्या राक्षे, सोनाली सांडभोर, अ‍ॅड. अनिल राक्षे, शिवराज यांचे वडील काळुराम राक्षे, भाऊ युवराज राक्षे, नवनाथ राक्षे, सुरज राक्षे, रोहन राक्षे आदींनी प्रयत्न केले.

Back to top button