बारामती लोकसभा मतदारसंघात बदल अटळ; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा विश्वास | पुढारी

बारामती लोकसभा मतदारसंघात बदल अटळ; माजी मंत्री विजय शिवतारे यांचा विश्वास

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : केव्हीके, आरटीओ, रेस्ट हाऊस, मेडिकल कॉलेज हे सर्व बारामतीतच का? असा प्रश्न आता बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना पडू लागला आहे. बारामती वगळता इतर तालुके सोडाच, पण बारामतीच्या जवळील भागाचासुद्धा विकास आजपर्यंत झालेला नाही. फक्त बारामती शहरासह पवारांसोबत असलेल्या वीस जणांचा विकास केला गेला. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या नेतृत्वात आता बदल होणारच, असा विश्वास माजी राज्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

खेड शिवापूर (ता. हवेली) येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवतारे म्हणाले, की गुंजवणी धरणाच्या पाणीप्रश्नाविषयी गेल्या तीन वर्षांत गुंजवणी संघर्ष समितीबरोबर एकही सभा विद्यमान खासदारांना घेता आली नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे यामध्ये मी स्वतः लक्ष घालून धरणाचे सहा टक्के पाणी शिवगंगा खोर्‍याला मिळवून देणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत 14 जिल्हा परिषद व 28 पंचायत समितीत बाजी मारण्याचा दावा त्यांनी केला.

कुस्ती, क्रिकेट अशा एक ना अनेक क्रीडा प्रकारांत पवार कुटुंबीय अग्रस्थानी बसलेले आहेत. या ठिकाणी त्यांना दुसरा माणूस दिसतच नाही, असे म्हणाले तरी वावगे ठरणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण आठ तालुके येतात, मात्र विकास बारामतीचाच होतो. हे सर्वसामान्य जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे या वेळी जनता बारामती लोकसभा मतदारसंघात निश्चितच बदल घडवतील, असे शिवतारे यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी काही प्रश्नांकडे लक्ष वेधले असता, त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची शिवापूर (ता. हवेली) येथील 40 वर्षांपासून ताब्यात असलेल्या जागेत येत्या काही दिवसांत उपबाजार सुरू करणार असून, श्रीराम नगर ते शिवापूर रस्त्याचे काम तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क करून मार्गी लावले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी शिंदे गटाचे शहरप्रमुख नीलेश गिरमे, ममता लांडे – शिवतारे, युवा जिल्हाप्रमुख नीलेश घारे, जिल्हा नियोजन सदस्य अमोल पांगारे, उपजिल्हाप्रमुख संजय दिघे, शहर उपप्रमुख दशरथ खिरीड, सरपंच अमोल कोंडे, उपसरपंच राजेंद्र कोंडे, राजू सट्टे, राजेंद्र दिघे, कैलास ओंबळे, रोशन सुर्वे आदी उपस्थित होते.

Back to top button