राज्यातील बॉयलर 20 एप्रिलअखेर थंडावणार; कारखान्यांच्या प्रतिदिन ऊस गाळप क्षमता वाढीचा फायदा | पुढारी

राज्यातील बॉयलर 20 एप्रिलअखेर थंडावणार; कारखान्यांच्या प्रतिदिन ऊस गाळप क्षमता वाढीचा फायदा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात चालू वर्ष 2022-23 मधील साठ टक्के उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. चालू वर्षी साखर कारखान्यांच्या दैनिक ऊस गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत प्रतिदिन 8 लाख 63 हजार 450 टनाइतके ऊस गाळप होत असल्याचा फायदा दिसून येत आहे. कारखान्यांकडून उसाचे पूर्ण क्षमतेने गाळप सुरू असल्याने पुढील अडीच महिन्यांत म्हणजे 15 ते 20 एप्रिलअखेर ऊस गाळप पूर्ण होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयातून वर्तविण्यात येत आहे.

राज्यात सद्य:स्थितीत 101 सहकारी आणि 99 खाजगी मिळून 200 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. साखर आयुक्तालयाच्या हंगामपूर्व ऊस गाळप 1343 लाख टन अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र, साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांबरोबरच्या विभागनिहाय बैठकीतील आकडेवारीनुसार चालू वर्षीचा ऊस गाळपाचा सुधारित अंदाज सुमारे 1 हजार 250 लाख टन आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत 726 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे.

तर 9.69 टक्के सरासरी उतार्‍यानुसार राज्यात 70 लाख टन साखरेचे उत्पादन तयार झालेले आहे. राज्यात कोल्हापूर विभागात 167.47 लाख टनाइतके सर्वाधिक ऊस गाळप, 187 लाख 22 हजार क्विंटलइतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार झालेले असून 11.18 टक्के साखर उतारा हाती आलेला आहे. त्या खालोखाल ऊस गाळप आणि साखर उत्पादनात सोलापूरची आघाडी असून साखर उतार्‍यात पुणे विभाग दुसर्‍या स्थानावर आहे.

राज्यात यापूर्वीच्या ऊस गाळप हंगामात म्हणजे 2021-22 मध्ये 1320 लाख टनाइतके उच्चांकी ऊस गाळप पूर्ण करण्यात आले होते. मात्र, जून महिनाअखेरपर्यंत ऊस गाळप हंगाम सुरू होता. त्या पार्श्वभूमीवर चालू वर्षीचा 2022-23 च्या हंगामातील उसाचे गाळप 15 ते 20 एप्रिलअखेर निश्चितच पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याची माहिती साखर सहसंचालक (विकास) पांडुरंग शेळके यांनी दिली. ते म्हणाले, 15 ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगामास सुरुवात झाली. तसेच कारखाने सुरू होण्याचे प्रमाण सुरुवातीपासूनच चांगले होते. ऊस गाळप क्षमतेत वाढ झाल्यामुळेही वेळेत उसाचे गाळप पूर्ण होण्यास मदत होत आहे.

राज्यातील ऊस गाळप (लाख टन), साखर उत्पादन (लाख क्विंटल), साखर उतारा (टक्के)
विभाग      ऊस गाळप        साखरउत्पादन        साखर उतारा
कोल्हापूर    167.47           187.22                   11.18
पुणे            152.17          147.06                     9.66
सोलापूर     175.48           153.64                     8.76
अहमदनगर 91.17            84.93                       9.32
औरंगाबाद   64.37            57.76                       8.97
नांदेड         66.49             64.80                       9.75
अमरावती     5.51               5.24                       9.51
नागपूर         3.38               2.62                        7.75
एकूण        726.04           703.27                      9.69

Back to top button