बारामती पोलिसांनी पकडला १० लाख रुपयांचा गांजा, मोटारीसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

बारामती पोलिसांनी पकडला १० लाख रुपयांचा गांजा, मोटारीसह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामती, पुढारी वृत्तसेवा: मोटारीच्या डिकीतून इंदापूरहून बारामतीमार्गे सासवडला नेला जात असलेला ५० किलो गांजा बारामती तालुका पोलिसांनी पकडला. ही कारवाई बारामती शहरानजीक रुई पाटी येथे करण्यात आली. मोटार चालक सचिन दिलीप रणवरे (वय३५, रा. हिवरकर मळा, सासवड, ता. पुरंदर) व सुनिता प्रताप चव्हाण (वय ३५, रा. सणसवाडी, ता. शिरुर, मूळ रा. माहूरगड, ता. पुसद, जि. नांदेड) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख रुपयांच्या गांजासह पाच लाखाची स्विफ्ट कार असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे हे स्वतः या कारवाईवेळी उपस्थित होते. इंदापूरच्या दिशेने रुई गावातून आलेली स्विफ्ट कार (एमएच १२ जेएस ००९०) ही थांबवत तिची तपासणी केली असता पोलिसांना त्यामध्ये ५० किलो गांजा आढळून आला.

पोलिस अधिक्षक अंकित गोयल, अपर अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, सपोनि योगेश लंगुटे, राहूल घुगे, सहाय्यक फौजदार साळवे व कर्मचाऱयांनी ही कारवाई केली.

Back to top button