पुणे : शेताजवळ आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

राहू : पुढारी वृत्तसेवा : शिंदेनगर राहू (ता. दौंड) येथील मुळा मुठा नदीच्या काठी असलेल्या जंगलाशेजारील शेतामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी (ता. २९) आढळून आला. येथील शेतकरी पुरुषोत्तम बाळासाहेब पुराणे या शेतक-यांच्या ऊसाची तोडणी करण्यासाठी कामगार आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नुकतेच मुळा मुठा नदीच्या पात्रात पारगाव येथे सात जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर राहू येथे महिलेचा मृतदेह आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी १८ सप्टेंबर २०२२ रोजी देखील राहू येथील शेतकरी बंडू विष्णु शिंदे यांच्या शेतामध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला होता. त्याचाही अद्याप शोध लागलेला नाही. या मृतदेहांचा शोध लावणे हे यवत पोलिसांसमोरील आव्हान बनले आहे.