पिंपरी : बहिणाबाई प्राणिसंग्रहालयात वर्षभरात सात मोर, एका मगरीचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : बहिणाबाई प्राणिसंग्रहालयात वर्षभरात सात मोर, एका मगरीचा मृत्यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड येथील निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील 8 प्राण्यांच्या वर्षभरात विविध कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात 1 मगर आणि 7 मोरांचा समावेश आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिलेल्या सन 2021-22 च्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. मगरीचा वृध्दत्वामुळे तर मोरांचा उष्णतेच्या परिणामाने हृदय बंद पडल्याने मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्राणिसंग्रहालय पर्यटकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आहे.

अंतर्गत नूतणीकरणाचे काम सुरू असल्याचे कारण प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मात्र, प्राणिसंग्रहालय बंद असल्यामुळे मोरांची व्यवस्थितरित्या काळजी घेतली गेली की नाही, उष्णतेपासून बचाव करण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने कोणती उपाययोजना केली होती का, केली होती तर 7 मोरांचा एकाच कारणाने मृत्यू कसा झाला, असे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. दरम्यान, प्राणिसंग्रहालय प्रशासनाने शवविच्छेदनानंतर मगरीचे दफन केले आहे. तर 7 मोरांचा अग्नी देऊन अंत्यसंस्कार केल्याची माहिती या अहवालातून देण्यात आली आहे.

प्राणिसंग्रहालयात फक्त 8 कर्मचारी…

प्राणिसंग्रहालयाची देखभाल, प्राण्यांची देखभाल करण्यासाठी अतिरिक्त मनुष्य बळाची नेहमीच गरज असते. मात्र, पिंपरीतील या प्राणिसंग्रहालयात फक्त आठ व्यक्ती काम करत आहेत. 1 संचालक, 1 क्युरेटर, 1 पशुवैद्यकीय अधिकारी, बायोलॉजिस्ट/एज्युकेशन अधिकारी, 1 हेड अ‍ॅनिमल कीपर, 1 अ‍ॅनिमल कीपर, 2 सहाय्यक अ‍ॅनिमल कीपर असा प्राणिसंग्रहालयाचा संपूर्ण स्टाफ आहे. त्यामुळे आठ जण संपूर्ण प्राणिसंग्रहालय सांभाळतात.

प्राणिसंग्रहालयातील प्राणी…
निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात विविध प्रजातीचे पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत. येत्या काळात आणखी काही पक्षी आणि सरपटणारे प्राणी येथे आणण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत या प्राणिसंग्रहालयाकडे 90 विविध प्रजातींचे पक्षी आणि 102 सरपटणारे प्राणी आहेत. असे एकूण मिळून 192 प्राणी या प्राणिसंग्रहालयात आहेत. 8 प्राणी दगावल्यामुळे संख्या कमी झाली असून पूर्वी येथे एकूण 200 प्राणी, पक्षी होते.

प्राणिसंग्रहालयातील मगरीच्या वृध्दत्वामुळे, तर 7 मोरांचा उष्णतेचा हाय शॉक बसल्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू झाला आहे. शासकीय यंत्रणेमार्फत या प्राण्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या प्राण्यांच्या खंदकामध्ये त्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना केलेल्या असतात.
– डॉ. अरुण दगडे, संचालक, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय, पिंपरी-चिंचवड

 

तीन वर्षांचे या प्राणिसंग्रहालयाचे आर्थिक बजेट..
सन/वर्ष निधी खर्च
2020-21 3.5 कोटी 2.90 कोटी
2021-22 2.1 कोटी 1.8 कोटी
2022-23 2.5 कोटी अद्याप खर्च झाला नाही

Back to top button