परराष्ट्र धोरणात जनभावनेचा विचार महत्त्वाचा; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मत | पुढारी

परराष्ट्र धोरणात जनभावनेचा विचार महत्त्वाचा; परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘परराष्ट्र धोरण हे देशांच्या सीमेबाहेर अगोदरही नव्हते आणि आताही नाही. आता तर ते लोकांच्या घरात पोहोचले आहे. 80 च्या दशकात लोकांच्या भावना वेगळ्या आणि देशाचे परराष्ट्र धोरण वेगळे होते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना जनभावनेचा विचार महत्त्वाचा आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरुक राहायला हवे,’ असे स्पष्ट मत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर न अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाच्या मराठी अनुवादीत ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विजय चौथाईवाले, डॉ. गिरीश आफळे, राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

डॉ. एस. जयशंकर म्हणाले, ‘जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल, तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतमार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे.

प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.’ ‘चीन जागतिक शक्ती असून, भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता, त्या देशासंबंधातील रणनीती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जाऊन प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारित धोरण ठरवावे लागेल,’ असेही त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, ‘युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही, हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून, कोणाच्याही दबावात येणारे नाही, हे जगाला दाखवून दिले.’

परराष्ट्र धोरणासाठी सहा सूत्रे…
स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशांतील भारतीयांचा विचार, ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल, असेदेखील डॉ. एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले.

Back to top button