संकुचित वृत्तीमुळेच मराठीचा घात! ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे वास्तवावर बोट

संकुचित वृत्तीमुळेच मराठीचा घात! ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे वास्तवावर बोट
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मराठीचा जगभरात असलेला प्रसार आपण परत आणला पाहिजे, तरच आपले दारिद्य्र मिटेल. एकेकाळी जगभरात कर्तृत्व गाजविलेल्या मराठीचा संकुचित वृत्तीमुळेच घात होत आहे, असे स्पष्ट मत व्यक्त करीत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शनिवारी वास्तवावर बोट ठेवले. महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे (अमेरिका) साधना ट्रस्ट आणि मासूम संस्था यांच्या सहकार्याने आयोजित साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव, शोभा चित्रे आदी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजन गवस, सोनाली नवांगुळ, अनिल साबळे, शरद बाविस्कर यांना साहित्य पुरस्कार, तर, नंदिनी जाधव, कुमारीबाई जमकातन, प्रमोद झिंजाडे, शांताराम पंदेरे यांना समाजकार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क'ला प्रदान करण्यात आलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर विशेष स्मृती पुरस्कार सत्यजित रथ यांनी स्वीकारला.

नेमाडे म्हणाले, "राष्ट्र हा भंपक प्रकार आहे. राष्ट्रवादामुळे युरोपचे नुकसान झाले आहे. तेच आता आपल्या देशात होत आहे. आपल्याकडे बक्षिसे खराब दिली जातात किंवा द्यायची नाहीत त्यांना दिली जात आहेत. अडीचशे रुपयांचे बक्षीस तेही विभागून दिल्याचेदेखील प्रकार घडतात. अशा वातावरणात फाउंडेशनने मोठे काम केले आहे. नि:स्वार्थी आणि उदारमतवादी हेच समाजाला पुढे नेणारे लोक असतात.
पठारे म्हणाले, सर्वत्र अघोषित भयाचे वातावरण आहे.

एखाद्या व्यक्तीविरोधात बोलल्यास देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती वाटते. आपल्या कृतीतून धैर्य प्रकट होणे महत्त्वाचे झाले आहे. त्यासाठी लेखकाने निर्भयपणे लिहिणे, कार्यकर्त्याने ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. प्रश्नांना भिडून माणुसकीचे रस्ते शोधण्यासाठी लेखन केले जाते. समाज म्हणून आपण अधिकाधिक अमानुष होत आहोत. भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. विनोद शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रमेश अवस्थी यांनी आभार मानले.

खिसेकापू पकडला जातो पण माणूस मारणारा नाही!
सगळ्या देशांत काम करणार्‍यांबरोबरच 'हरामखोर' लोकही आहेत. देशी असणे याचा अर्थ सर्वांवर प्रेम करणे होतो. बाहेरील गोष्टींचे संस्करण आणि देशीकरण केल्यास माणूस उदारमतवादी होतो. सामाजिक कामातून फारसा फरक पडत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे सामाजिक काम सोडून दिले. खिसेकापू पकडला जातो पण माणूस मारणारा पकडला जात नाही. याला संस्कृती म्हणायचे का, असा सवाल भालचंद्र नेमाडे यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या पुरस्कारासाठी कधी अर्ज केला नाही
जगभरात आहे रे आणि नाही रे असे दोन्ही वर्ग आहेत. मराठी संस्कृती जगभर पसरली आहे. मराठी लोकांनी खुप क्रांती केली आहे, असे सांगत नेमाडे म्हणाले, 'अर्ज मागवून राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. मात्र, राज्य शासनाच्या अटी भयानक आहेत. अर्ज करणार्‍यांना हे पुस्तक मी स्वत:च लिहिले आहे, असे सांगावे लागते. अनेक ज्येष्ठ साहित्यिक ते लिहून देतात. ही गोष्ट मला कधीच पटली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या पुरस्कारासाठी मी कधीच अर्ज केला नाही.'

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news