वाडा : बिबट्याने केले दोन बोकड फस्त; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

वाडा : बिबट्याने केले दोन बोकड फस्त; शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण

वाडा(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : चास-कमान धरणाजवळ असलेल्या बुरसेवाडी  येथील शेतकरी अशोक जयराम कोंढावळे यांच्या राहत्या घराजवळील गोठ्यात शनिवारी (दि. 28) पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोठ्यातील बोकड (साधारण नऊ महिने वयाचे) फस्त केले. गोठ्याच्या कोपर्‍यातून बिबट्याने प्रवेश करीत गोठ्यातील दोन बोकडांचा मानेवर चावा घेऊन त्यांना ठार करत शरीराचे ठिकठिकणी लचके तोडले. अन्य दोन बोकड बिबट्याने जंगलात ओढून नेल्याचे शेतकरी सांगत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वनपाल गिरीश कुलकर्णी, वनरक्षक संदीप अरुण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, जंगलात नेलेल्या दोन बोकडांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी वनपाल गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, नागरिकांनी एकटे फिरू नये, घोळक्याने एकत्र राहा, हातात काठी बाळगा, जनावरांच्या गोठ्यांना पक्की दारे लावा व हल्ल्याची घटना झाल्यास वन विभागाला कळवा. हल्ला झालेल्या प्राण्याची परस्पर विल्हेवाट लावू नका. शासनाच्या परिपत्रकाप्रामाणे संबंधित शेतकर्‍यास नुकसानभरपाई देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button