वळतीत दहशत सुरूच; पिकांना पाणी देणे बनले कठीण
पारगाव (ता. आंबेगाव; पुढारी वृत्तसेवा : वळती येथील तागडेवस्ती परिसरात बिबट्यांची दहशत सुरूच आहे. दररोज शेतांमध्ये बिबट्यांच्या पावलांचे ठसे पाहायला मिळत असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरीवर्गात भीती निर्माण झाली आहे. ऊसतोड सुरू असल्याने बिबट्यांना लपण जागा राहिली नसल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात रांजणी, वळती, नागापूर, पारगाव, शिंगवे आदी गावांमध्ये उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. आता ऊसतोडी वेगात सुरू आहे.
त्यामुळे बिबट्यांंचा अधिवास संपत चालला आहे. लपण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. वळती गावठाणानजीक तागडे वस्तीत जंगल मोठ्या प्रमाणात आहे. तसेच उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. येथून मीना नदीपात्र तसेच ओढ्याच्या पात्रांमध्ये तुडुंब पाणी आहे. येथे गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे.
एकाच शेतामध्ये चार बिबट्यांचा वावर येथील लोंढे वस्तीत असल्याचे शेतकर्यांनी पाहिले होते. येथील शांताराम लोखंडे यांच्या उसाच्या कडेला पाटामध्ये दररोजच बिबट्यांच्या पावलांचे ठसे आढळून येत आहेत. त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण बनले आहे. त्यांच्या वीजपंपांच्या पेट्या शेतामध्ये मध्यावर आहेत. पंप सुरू करण्यासाठी दररोजच त्यांना जीव मुठीत धरून जावे लागते. शनिवारी (दि.28) राहुल शांताराम लोखंडे हे पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना शेताच्या कडेला असलेल्या पाटात बिबट्यांच्या पावलांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आले.

