महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेंचा आज नागरी सत्कार; अजित पवार, आ. मोहिते पाटील राहणार उपस्थित | पुढारी

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेंचा आज नागरी सत्कार; अजित पवार, आ. मोहिते पाटील राहणार उपस्थित

भामा आसखेड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सर्वोच्च महाराष्ट्र केसरी किताब व मानाची गदा मिळविल्याबद्दल पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील राक्षेवाडी गावचे कर्तबगार सुपुत्र पहिलवान शिवराज काळुराम राक्षे यांचा तालुक्याच्या वतीने भव्य नागरी सत्कार रविवारी (दि. 29) राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा नुकत्याच पुण्यातील कोथरूड येथे झाल्या. महाराष्ट्र केसरीसाठी कुस्तीचा अंतिम सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात होऊन शिवराजने अवघ्या दोनच मिनिटांत महेंद्रला चितपट करीत सन 2022-23 या वर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब व स्व. मामासाहेब मोहोळ मानाची गदा मिळविली.

महाराष्ट्र केसरी झाल्याबद्दल पै. शिवराज राक्षे यांचे राज्याच्या अनेक भागांत सत्कार होत आहेत. जन्मभूमी असलेल्या खेड तालुक्यात पै. शिवराज यांचा नागरी सत्कार सोहळा रविवारी (दि. 29) राजगुरुनगर येथील खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. सत्कार सोहळ्यापूर्वी पै. शिवराज यांची भव्य मिरवणूक दुपारी 2 ते 5 यादरम्यान राक्षेवाडीचे ग्रामदैवत वाघोबा महाराज व विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून पुणे-नाशिक महामार्ग ते बाजार समितीच्या मैदानापर्यंत होणार आहे.

मिरवणुकीत आणि सत्कार सोहळ्याला राज्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक नामवंत पहिलवान उपस्थित राहणार आहेत. मिरवणुकीनंतर खेड तालुक्याच्या वतीने पै. शिवराजचा नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार असून, जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व अनेक पक्षांचे मान्यवर या सत्कार सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पै. शिवराज यांचा संपूर्ण तालुक्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा आयोजित केला असून, या सोहळ्यात शिवराजला भविष्यातील खेळासाठी भरीव आर्थिक मदत आणि शासकीय सेवेत घेणेबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार व तालुक्याचे आमदार मोहिते पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांची मिरवणूक आणि नागरी सत्कार सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोक राक्षे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल राक्षे,जितेंद्र राक्षे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सतीश राक्षे, उपसरपंच मच्छिंद्र राक्षे, पोलिस पाटील पप्पूकाका राक्षे यांनी केले.

Back to top button