राज्यात पुणे सर्वांत थंड; किमान तापमान 11.3 अंश | पुढारी

राज्यात पुणे सर्वांत थंड; किमान तापमान 11.3 अंश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात शनिवारी राज्यात नीचांकी तापमानाची नोंद झाली असून, तापमानाचा पारा 11.3 अंशांवर घसरला आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, शहरात अशंत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.तर, राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी पुन्हा वाढली आहे.

शनिवारी सकाळपासूनच शहरात दिवसादेखील थंडी जाणवत होती. सायंकाळी त्यामध्ये वाढ झाली. रात्री थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवसांत थंडी वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून, हा पट्टा 31 जानेवारीला श्रीलंकेकडे सरकणार आहे. दरम्यान, या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा या भागात विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात वाढ झाली असून, बहुतांश भागांत ढगाळ वातावरण आहे.

Back to top button