पुणे : ’बार’च्या निवडणुकीत होऊ दे खर्च’; साडीवाटप, पाणीपुरी, वडापाव, सामोसा पार्ट्यांचा धडाका | पुढारी

पुणे : ’बार’च्या निवडणुकीत होऊ दे खर्च’; साडीवाटप, पाणीपुरी, वडापाव, सामोसा पार्ट्यांचा धडाका

शंकर कवडे

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीचा ज्वर अंतिम टप्प्यात आला असून, न्यायालय परिसरात साडी, पर्सवाटप तसेच पाणीपुरी, वडापाव, सामोसा पार्ट्यांचा न्यायालयात धडाका सुरू आहे. असोसिएशनच्या निवडणुकीसाठी वकील उमेदवारांकडून वेगवेगळ्या मार्गांनी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे बार असोसिएशनसाठी येत्या 31 जानेवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार या पदांसाठी मतदान होणार आहे.

असोसिएशनचे जवळपास 5 हजारांहून अधिक सभासद यासाठी मतदान करणार आहेत. त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळे फंडे अजमाविण्यास सुरुवात केली आहे. हायटेक प्रचारापासून भेटवस्तू वाटपापर्यंत उमेदवारांनी खर्च करण्याचा सपाटा लावला आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधत महिला उमेदवारांकडून हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येत असून, त्यामध्ये पर्स, साडी, पाऊच, फोल्डर वाटप करण्यात येत आहे. याखेरीज न्यायालय परिसरात पाणीपुरी, चाट पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे.

स्नेहमेळाव्यातून वकिलांसाठी विविध हॉटेल्समध्ये पंचपक्वान्नांचे जेवण ठेवण्यात येत आहे. वकीलवर्गाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत असून, उमेदवारांच्या प्रचाराच्या या पध्दतीमुळे वकीलवर्गात मात्र आनंदाचे वातावरण आहे. निवडणुकांसाठी उमदेवारांकडून प्रचारासाठी होत असलेल्या नवनवीन फंड्यांमुळे न्यायालयीन कामकाजासाठी येणारे पक्षकार, कर्मचारी तसेच पोलिस प्रशासनामध्ये यामध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांकडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. चित्र तसेच व्हिडीओस्वरूपात उमेदवारांपर्यंत पोहचून प्रचार करण्यावरही उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याचे दिसून येते. कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहचणे सहजशक्य होत असल्याने सोशल मीडियावरील हायटेक प्रचाराची पध्दत प्रभावी ठरत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

यांच्यात होणार लढत
अध्यक्ष (1 जागा)
राहुल दिंडोकर
केतन कोठावळे
राणी कांबळे
जयश्री होले
उपाध्यक्ष (2 जागा)
गीतांजली बालवडकर
जयश्री चौधरी-बिडकर
अमेय देशपांडे
संजय पाटणकर
विश्वजित पाटील
पूनम स्वामी-प्रधान
सचिव (2 जागा)
राहुल कदम
गंधर्व कवडे
मकरंद मते
खजिनदार
समीर बेलदरे
प्रदीप चांदेरे

Back to top button