शिरसाई डावा कालव्याला आवर्तन

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील जिरायती पट्ट्याला वरदान ठरलेल्या शिरसाई डावा कालव्याला बुधवारी (दि. 25) आवर्तन सोडण्यात आले आहे. तीन पंपांद्वारे हे आवर्तन सोडण्यात आले असून, डावा कालव्यातील लाभार्थी क्षेत्रातील शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, कांदा, मका, गहू तसेच ऊसासारख्या पिकांना याचा मोठा फायदा होणार असून, जनावरांच्या चार्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने शेतकरीवर्ग समाधान व्यक्त करीत आहेत.
यंदा सतत वातावरणात बदल होत असल्याने विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट जाणवत होती. त्यात यंदा पाऊस भरपूर प्रमाणात झाल्याने यंदा जिरायती भागात उसाची लागण मोठ्या प्रमाणात झाली. त्यात ऐनवेळी आवर्तन सुटल्याने याचा पिकांना मोठा फायदा होणार असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत.
चालू पाणीपट्टी तसेच थकीत पाणीपट्टी रक्कम पूर्ण भरावी. ज्यानुसार शेतकर्यांची मागणी असेल तसे शेतकर्यांना पाणी मिळणार आहे. जवळपास 25 दिवस हे आवर्तन चालणार असून, एमसेफटी 29 हजार रुपयांप्रमाणे पाणी दर आहेत.
– अमोल शिंदे, स्थापत्य अभियांत्रिकी, पाटबंधारे विभाग