तळेगाव ढमढेरे : राजकीय बळाचा वापर करून पिकाचे नुकसान; माजी उपसभापतींचा पराक्रम

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे हद्दीतील मुळेवस्ती येथील शेतजमीन गट नं. 1411, 1429, 1409 चा दावा न्यायप्रविष्ट असताना तसेच सरकारी मोजणी संबंधित शेतकर्याने फेटाळली असताना बेकायदेशीररीत्या राजकीय बळाचा वापर करून शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी पोलिसांसमोर शेतकर्यांच्या उभ्या पिकांचे जबरदस्तीने नुकसान केले. याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी नीलेश मुळे आणि संग्राम मुळे यांनी पोलिस अधीक्षक पुणे आणि शिरूर तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मुळेवस्ती येथे शेतकरी नीलेश मुळे आणि संग्राम मुळे गेल्या तीस वर्षांपासून शेती करीत आहेत. त्यांच्या ताब्यातील जमिनीचे बेकायदेशीर खरेदीखत झाल्याचा दावा न्यायालयात चालू असताना अचानक शेतजमीन मिळकतीत भूमिअभिलेख कार्यालयातून मोजणीकरिता नोटीस पाठविलेली आहे. सदरील मोजणीकरिता तक्रारदारांनी भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीकरिता आक्षेप घेतला आहे.
तरीही राजकीय बळाचा वापर करून शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे यांनी बळजबरीने ऊसपिकांचे नुकसान केले आहे तसेच विष्णू हरगुडे यांनी तेथील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना हाताशी धरून मोजणीकरिता नोटीस पाठवून तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशनमधून अनाधिकाराने त्यांची दिशाभूल करून नोटीस पाठवली, असा आरोप तक्रारदार मुळे यांनी तक्रार अर्जात केला आहे. दिलेल्या तक्रारीवर काय कारवाई होणार? याकडे लक्ष वेधले आहे.