पिंपरी : ‘...तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनण्यात समस्या’ : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी | पुढारी

पिंपरी : ‘...तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनण्यात समस्या’ : केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी

पिंपरी :  एकविसाव्या शतकात ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्ञानाद्वारे आपण संपत्ती निर्माण करू शकतो. देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा केवळ 12 टक्के आहे. तो वाढून जोपर्यंत 24 टक्क्यांच्या पुढे जात नाही, तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनण्यात खूप समस्या आहेत. ग्रामीण क्षेत्रात गरीबी, बेरोजगारी आणि दारिद्रय आहे. ते नष्ट करण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालावी लागणार आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ताथवडे येथील बालाजी विद्यापीठाच्या पदवी प्रदान कार्यक्रमासाठी ते आले होते. त्या प्रसंगी त्यांनी हे मनोगत व्यक्त केले. गडकरी म्हणाले, देशाच्या जीडीपीमध्ये शेती क्षेत्राचा 12 टक्के, उत्पादन क्षेत्राचा22 ते 24 टक्के, तर, सेवा क्षेत्राचा 52 ते 54 टक्के इतका वाटा आहे. शेती क्षेत्राचा असलेला 12 टक्के वाटा जोपर्यंत 24 टक्क्यांच्या पुढे जात नाही, तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनण्यात खूप अडचणी आहे.

पुण्यामध्ये 14 विद्यापीठ आहेत. खासगी क्षेत्रात चांगले विद्यापीठ येत आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होणे ही काळाची गरज आहे. ज्ञानाद्वारे नोकरी मिळेल. मात्र, आपला व्यवहार, शालीनता, नम्रता, इतरांचा आदर करण्याची वृत्ती देखील महत्त्वाची आहे. केवळ संपत्ती, सत्तेची ताकद महत्त्वाची नाही. तुमचे इतर व्यक्तींसोबत कसे नातेसंबंध आहे, हे महत्त्वाचे आहे. उद्योग आणि गंतवूणक ही महत्त्वाची आहे, असे नमूद करुन गडकरी म्हणाले, उद्योगांशिवाय रोजगार निर्मिती होणार नाही. बेरोजगारी दूर करण्यासाठी उद्योगधंद्यांचा विकास गरजेचा आहे. भविष्यात ग्रीन हायड्रोजन ही एक शक्ती ठरणार आहे. अर्थशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण जागृती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी एक तरी झाड लावण्याचा
संकल्प करावा.

पुण्यातील प्रदूषणाविषयी चिंता

पुण्यामध्ये पुर्वी शुद्ध हवा होती. सध्या पुण्यात प्रदुषण वाढले आहे. वाहतूकीची समस्या निर्माण झाली आहे. पुणे किती चांगले होते, सध्या पुणे कसे झाले आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, पुण्यासाठी आपण नवीन रिंग रस्ता बनवितो आहे. नागपूर ते पुणे हे अंतर 6 तासात तर, पुणे ते बंगळूर हे अंतर 4 तासात गाठता येईल.

Back to top button