उर्से गावच्या हद्दीत 47 लाखांचे मद्य जप्त | पुढारी

उर्से गावच्या हद्दीत 47 लाखांचे मद्य जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उर्से गावच्या हद्दीत शुक्रवारी वाहनांची तपासणी करण्यात आली. यात गोवानिर्मित मद्याची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले असून, सुमारे 47 लाख 52 हजारांचे मद्य पकडण्यात आले. यामध्ये दोन वाहनेही जप्त केली असून, एकूण 63 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से (ता. मावळ, जि. पुणे) गावच्या हद्दीत पथकर नाक्याजवळ अवैध मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या परिसरात सापळा लावण्यात आला. यात कंटेनरची (एमएच 01-8007) तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गोवानिर्मित मद्य आढळून आले. रॉयल ब्लू माल्ट व्हिस्की 180 मिलीच्या 43 हजार 200 बाटल्या (900 बॉक्स), असा मिळून 47 हजार 52 हजारांचा मुद्देमाल तसेच सहाचाकी कंटेनर मिळून 62 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी गामित सोमवेलभाई सिंगाभाई (वय 25, ट्रकचालक, रा. ओटा, जि. तापी, गुजरात) आणि मोहन दिनराम खथात (वय 34, ट्रकक्लीनर, रा. रुद्रपुरा, जि. भिलवाडा, राजस्थान) या दोघांना अटक केली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त अनिल चासकर, अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय सराफ, दीपक सुपे, प्रवीण शेलार, सागर दुर्वे, आर. व्ही. ओळ या अधिकार्‍यांसह आर. सी. लोखंडे, राहुल जोंजाळ, तात्याबा शिंदे, एस. डी. गळवे, रणजित चव्हाण, हनुमंत राऊत यांनी ही कारवाई केली.

Back to top button