पुणे : सर्वांना सोबत घेऊन पोटनिवडणूक जिंकू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील | पुढारी

पुणे : सर्वांना सोबत घेऊन पोटनिवडणूक जिंकू : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पोटनिवडणूक जिंकायची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,’ अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी भाजपची महाबैठक झाली. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आमदार माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भाजपचे 40 असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भाजपचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करून, हा बालेकिल्ला तयार केला आहे. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुखपद आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविले आहे. संजय काकडे सहायक म्हणून काम पाहतील. कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. एक शक्ती केंद्र तयार करून एक केंद्र एका नगरसेवकाला दिले जाणार आहे. माधुरी मिसाळ या मुरलेल्या राजकारणी आहे. त्या सर्वांना भेटून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतील.

इच्छुकांची नावे वरिष्ठांकडे पाठवली आहेत. त्यानंतर 1, 2 तारखेला उमेदवार जाहीर होऊ शकतो, असेही ते म्हणाले.
आंबेडकर यांच्या ’त्या’ भूमिकेबद्दल आभार केंद्रीय तपास यंत्रणाकडून गैरवापर होताना दिसत नाही, अशी भूमिका वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेबद्दल आभार मानतो.

2014 पासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. तेव्हापासून आजअखेर देशातील कोणत्याही राज्यात विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली नाही. तसेच पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पाटील म्हणाले, काही प्रश्नांची उत्तरे कधीच मिळत नाहीत. देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत. ज्या वेळेस ते पुस्तक लिहितील त्यावेळेसच कळेल की नेमके काय झाले होते.

संजय काकडेंचा सज्जड दम
या बैठकीत माजी खासदार संजय काकडे यांनी इच्छुकांना आणि माजी नगरसेवकांना दम भरला. ते म्हणाले, या निवडणुकीवर माझे लक्ष असणार आहे. प्रत्येक प्रभागात कोणाला किती मते मिळाली याची माहिती घेतली जाईल. ज्या प्रभागात मते कमी असतील तेथील इच्छुकांचा नगरसेवकपदाच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल. चमचेगिरी करून काही होणार नाही, असे सांगत काकडे यांनी नेत्यांच्या मागे-पुढे फिरणार्‍यांचा समाचार घेतला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Back to top button