पुणे : रुंदीकरणामुळे वाहने धावणार सुसाट; ‘बीआरटी’सह सहा लेन | पुढारी

पुणे : रुंदीकरणामुळे वाहने धावणार सुसाट; ‘बीआरटी’सह सहा लेन

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : संरक्षण खात्याच्या मान्यतेअभावी प्रदीर्घ काळ अडकलेल्या पुणे-मुंबई रस्त्याच्या खडकी रेल्वेस्थानकासमोरील भागाच्या रुंदीकरणाचे काम नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे सुमारे सव्वादोन किलोमीटर लांबीचा हा रस्ता सध्यापेक्षा दुप्पट म्हणजे 42 मीटर रुंदीचा होणार असून, त्यात बीआरटीसह सहा लेन असतील. यामुळे पुण्याहून पिंपरीकडे जाताना मोठा अडथळा दूर होऊन वाहतुकीचा वेग वाढणार आहे. खडकी कॅन्टोन्मेट बोर्डाच्या हद्दीतील जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे 42 मीटर रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले.

शिवाजीनगरपासून खडकीपर्यंत आणि खडकीच्या पुढच्या भागापासून बोपोडीपर्यंतचा रस्ता 42 मीटर रुंदीचा करण्याचे काम काही वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले. मात्र, संरक्षण विभागाची मान्यता मिळत नसल्याने खडकी रेल्वेस्थानकाजवळील सव्वादोन किलोमीटरचे काम रखडले होते. यासाठी तत्कालीन खासदार अनिल शिरोळे, तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आदी अनेकांनी थेट संरक्षणमंत्र्यांपर्यंत दाद मागितली. सुरुवातीला तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली, तर राजनाथ सिंह संरक्षणमंत्री झाल्यावर त्यांच्याकडेही याबाबत पाठपुरावा करण्यात आला.

स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही खासदार बापट यांच्याबरोबर राजनाथ सिंह यांची दिल्लीत जाऊन भेटही घेतली. त्यानंतर सरकारी सूत्रे हलली आणि संरक्षण विभागाची मान्यता मिळाली. मात्र, त्यासाठी त्या विभागाने काही अटी घातल्या. त्यात संरक्षण विभागाने खडकीच्या जागेच्या बदल्यात अन्यत्र जागा मागितली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विभागीय आयुक्त सौरव राव यांनी शासनाची मान्यता घेत येरवड्यातील 10.49 एकर शासकीय जागा संरक्षण विभागाला दिली. त्यानंतर संरक्षण विभागाची रस्ता रुंदीकरणाच्या कामाची वर्किंग परवानगी 18 मे 2022 रोजी मिळाली. संरक्षण विभाग, महामेट्रो आणि महापालिका यांच्यात करारनामा झाला. ही जागा प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात महापालिकेकडे आली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन आता कामाला सुरुवात झाली.

वाहनांसाठी दोन लेनचा रस्ता.
मध्यभागी मेट्रो खांबालगत बीआरटी मार्ग व स्थानके.
दोन्ही बाजूला 4.5 मीटर रुंदीचे सेवा रस्ते.
सायकल ट्रॅक व पदपथ.
पावसाळी गटारे, ड्रेनेज, विद्युत विभागाची कामे होणार.

एकूण खर्च
62.67
कोटी रुपये

रस्त्याची लांबी 2.2 किलोमीटर

जुना पुणे-मुंबई रस्त्यावर खडकीमध्ये रुंदीकरण झाले नव्हते. पिंपरीहून स्वारगेटला मेट्रो सुरू होत असल्यामुळे त्यासोबतच खडकीतील रस्ता रुंदीकरणाची गरज वाढली. महापालिका, राज्य सरकार यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या पाच-सहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झाले असून, दोन वर्षांत काम पूर्ण होईल. दोन्ही महापालिकांसह खडकीतील वाहनचालकांची सोय होईल तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही सक्षम होईल.

                                                     – सिद्धार्थ शिरोळे, आमदार, शिवाजीनगर.

शिवाजीनगरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापासून हॅरीस पुलापर्यंत साडेपाच किलोमीटरचा रस्ता आहे. खडकीतील रस्ता रुंदीकरण दोन वर्षांत झाल्यानंतर हा संपूर्ण रस्ता 42 मीटर रुंदीचा होईल. मध्यभागातून बीआरटी मार्ग व मेट्रो असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक गतिमान होईल.

                                                               – व्ही. जी. कुलकर्णी,
                                                 मुख्य अभियंता (पथ), पुणे महापालिका.

Back to top button