पुणे: दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू, शिक्रापूर हद्दीतील दुर्घटना | पुढारी

पुणे: दोन दिवसांत वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू, शिक्रापूर हद्दीतील दुर्घटना

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस ठाणे हद्दीमध्ये दोन दिवसांमध्ये शिक्रापूर, कोरेगाव भीमा आणि जातेगाव फाटा येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये महेश राजाराम गव्हाणे, श्रीकांत सूर्यकांत उबाळे, उद्धव सखाराम सातपुते, बाबूशोना आबेद अली शेख व अजयभान चंद्रकांतभाई भावसार या पाच जणांचा मृत्यू झाला.

शिक्रापूर हद्दीमध्ये बुधवारी (दि. २५) रात्री १० वाजेच्या सुमारास महेश राजाराम गव्हाणे (वय २५, रा. फडतरेवस्ती, कोरेगाव भीमा, ता. शिरूर) हा दुचाकीने (एमएच १२ व्हीडी १३९३) चालला होता. या वेळी पाठीमागून अहमदनगर बाजूने आलेल्या कारची (एमएच १२ एसवाय १९९०) महेशला धडक बसून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, महेशला घेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेची आणखी एका दुचाकीला (एमएच १२ डीडब्ल्यू ६०७३) धडक बसून दुचाकीचालक श्रीकांत सूर्यकांत उबाळे (वय २६, रा. ढेरंगेवस्ती, कोरेगाव भीमा) याचा मृत्यू झाला, तर रुग्णवाहिकेचा चालक वैभव गजानन डोईफोडे व अक्षय रवींद्र बनसोडे (दोघे रा. बजरंगवाडी, शिक्रापूर, ता. शिरूर) हे जखमी झाले.

या दोन अपघातांनंतर गुरुवारी (दि. २६) पहाटे सहाच्या सुमारास उद्धव सखाराम सातपुते (वय ३५, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर; मूळ रा. इसाद, ता. गंगाखेड, जि. परभणी) हे शिक्रापूर-पाबळ चौकातून रस्ता ओलांडत असताना पुण्याकडून आलेल्या अज्ञात वाहनाची सातपुते यांना धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास चाकण रस्त्यावरील पंजाबी ढाब्यासमोर बाबूशोना आबेदअली शेख (वय २७, रा. करंदी फाटा, ता. शिरूर; मूळ रा. सीजग्राम, ता. भरतपूर, जि. मुर्शिदाबाद, कोलकता) हे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास अजयभान चंद्रकांतभाई भावसार (वय ३८, रा. सोनगढ, ता. सोनगढ, जि. तापी, गुजरात) हा शिक्रापूर-चाकण रस्त्यानजीक हॉटेल चंद्रमासमोरून रस्ता ओलांडत असताना त्यांना कारची (एमएच १४ केजे ६२१९) धडक बसून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी शंकरसन श्रीनरहरी राऊत (रा. लोहगाव, पुणे), रुग्णवाहिकेचा चालक वैभव गजानन डोईफोडे आणि आदित्य बापू हांडे (रा. चिंचोशी, ता. खेड) यांच्यासह दोन अज्ञात वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

Back to top button