पुणे, पुढारी वृत्तसेवा: स्वारगेटजवळ एका दुकानाला लागलेल्या आगीत स्क्रॅप खुर्च्या आणि कुशन जाळून खाक झाले. ही घटना २६ जानेवारी रोजी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांसह तीन बंब आणि इतर वाहने दाखल झाली. अवघ्या अकरा मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात यश आले.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील नाईक बी बियाणे दुकानाजवळ एका दुकानाला आग लागली होती. या दुकानामध्ये स्क्रॅप खुर्च्या, सोफासेट आणि इतर साहित्य होते. दरम्यान दुकानात फॅब्रिकेशनचे काम सुरु होते. यातूनच आगीची ठिणगी उडून आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या आगीत दुकानातील साहित्य जाळून खाक झाले असले, तरी यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
कर्तव्यावर असलेले अधिकारी प्रदीप खेडेकर, अजीम शेख, सुधीर नवले, चंद्रकांत मेणसे, अजय कोकणे, अतुल मोहिते आणि उमेश शिंदे यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.