चिंचवडच्या जागेवर आता शिवसेनेचा दावा; महाविकास आघाडीत एकमत होणार की बिघाडी? | पुढारी

चिंचवडच्या जागेवर आता शिवसेनेचा दावा; महाविकास आघाडीत एकमत होणार की बिघाडी?

पिंपरी : चिंचवड विधासनभा मतदारसंघाची जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावेदारी केली आहे. असे असताना आता त्या जागेवर महाविकास आघाडीतील शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) दावा केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीत एकमत होते की बिघाडी, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात ताणली गेली आहे. विधानसभेच्या ऑक्टोबर 2019 ला झालेल्या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघात शिवनेसेचे गटनेते नगरसेवक राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती.

त्या निवडणुकीत भाजपचे दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांना 1 लाख 50 हजार 723 मते (54.17 टक्के) मिळाली होती. तर, अपक्ष राहुल कलाटे यांना 1 लाख 12 हजार 225 मते (40.34 टक्के) मिळाली होती. कलाटे यांना राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस व बहुजन वंचित आघाडीचा पाठिंबा होता. त्यामुळे या जागेवर शिवसेनेने दावा केल्याचे बोलले जात आहे.

मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व पुणे विभागाच्या प्रमुख नेते व पदाधिकार्‍यांची बैठक मंगळवारी (दि.25) झाली. त्यात महाविकास आघाडीत चिंचवड विधानसभा निवडणूक शिवसेनेने लढावी आणि उमेदवार द्यावा. तर, पुण्यातील कसबा विधानसभेबाबत राष्ट्रवादी व काँग्रेसने चर्चा करून उमेदवार द्यावा, अशी चर्चा झाली. त्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे.

चिंचवडच्या जागेवर प्रमुख दावेदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर शिवसेनेने दावा केल्याने राष्ट्रवादीची गोची झाली आहे. शिवसेनेचा उमेदवार देण्यावर एकमत होणार की महाविकास आघाडीत बिघाडी होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमवेत प्रमुख नेत्यांची मातोश्रीवर काल झालेल्या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने लढविण्याचा निर्णय झाला आहे.

या मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून, पोटनिवडणूक लढविण्याची मागणी आम्ही पूर्वीच केली होती. पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार शिवसेना पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे. निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. पक्षाकडे 5 ते 6 सक्षम इच्छुक आहेत. तसेच, इतर पक्षाचेही इच्छुक आहेत, असे शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अ‍ॅड. सचिन भोसले यांनी सांगितले.

‘वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य’
चिंचवड विधानसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही वरिष्ठ नेतेमंडळी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करतील. त्यात जो अंतिम निर्णय होईल, तो मान्य राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

Back to top button