पिंपरी : ‘इंद्रायणी थडीमुळे 20 हजार महिलांना रोजगार’ | पुढारी

पिंपरी : ‘इंद्रायणी थडीमुळे 20 हजार महिलांना रोजगार’

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया या कार्यक्रमामध्ये 50 टक्के महिलांनी सहभाग घेत व्यवसायात आघाडी घेतली आहे. त्याचप्रमाणे, ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला आहे. इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून 1 हजार महिला बचतगटांना संधी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून सुमारे 20 हजार महिलांच्या हाताला रोजगार मिळाला, ही बाब कौतुकास्पद आहे, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केली.

आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर ‘इंद्रायणी थडी- 2023’ महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, हिंदूत्वाचे पुरस्कर्ते कालिचरण महाराज, पद्मश्री गिरीश प्रभुणे, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार राहुल कुल, उमा खापरे, जगदीश मुळीक, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार शरद सोनवणे, बापुसाहेब पठारे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप, कांचन कुल, शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रभू श्रीराम यांची मूर्ती देऊन माजी महापौर उषा ढोरे, नितीन काळजे, राहुल जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच, माजी समिती सभापती विलास मडीगेरी, सतोष लोंढे यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांचा सन्मान करण्यात आला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे आणि बाबूराव पाचर्णे यांच्या कुटुंबीयांनाही प्रभू श्रीराम मूर्ती भेट देण्यात आली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपा सत्ताकाळात राज्यातील महिला बचतगट सक्षमीकरण चळवळीच्या माध्यमातून 3 लाखांहून 57 लाख महिलांना जोडण्यात आले. महिलांना 1 लाखापर्यंतचे लोन बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला. महिला बचतगटांची कर्जवसुली 100 टक्के होते. अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रवाहात महिलांना सहभागी करून घेतले पाहिजे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना उद्योगांशी जोडले पाहिजे.

अयोध्येत साकारणार्‍या प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती गावजत्रा मैदान येथे साकारल्याचा उल्लेख करुन फडणवीस म्हणाले, सुमारे 700 ते 800 वर्षांचा लढा दिल्यानंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारत आहे. प्रभू श्रीराम हे केवळ ईश्वराचे अवतार नाही, तर ते राष्ट्रपुरुष आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक, दिगंबर भेगडे, बाबूराव पाचर्णे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांची अर्धाकृती शिल्पे उभारण्यात आली आहे. तसेच, आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री हिराबाई लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ इंद्रायणी थडी जत्रा मातृत्वाला समर्पित केली. त्यांचेही अर्धाकृती शिल्प उभारून मातांविषयी आदर व्यक्त केला.

भव्य-दिव्य संकल्पना आणि उपक्रम राबविणारे आमदार लांडगे हे संवेदनशील मनाचे आमदार आहेत, हे यातून दिसत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. पाटील म्हणाले की, महेश लांडगे यांचा प्रत्येक उपक्रम भव्य-दिव्य असतो. बैलगाडा शर्यत, पक्षनिष्ठा पुतळे, प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृती, ग्रामीण संस्कृती, रिव्हर सायक्लोथॉन असे रेकॉर्ड ब्रेक उपक्रम राबवले जात आहेत.महिला बचतगटांकडून तयार केलेल्या वस्तूंना मार्केट मिळाले पाहिजे, तर प्रोत्साहन मिळेल.

लांडगे म्हणाले की, कोरोनानंतर दोन वर्षाच्या कालावधीने प्रथम बैलगाडा स्पर्धा घेतली. त्यानंतर इंद्रायणी थडी जत्रा भरविली आहे. या जत्रेमध्ये एक हजार महिला बचतगटांना स्टॉल देण्यात आले आहे. त्यातुन जवळपास 20 हजार महिलांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांनी प्रास्ताविक केले. कालिचरण महाराज यांनी शिवतांडव स्त्रोत पठन केले. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विजय फुगे यांनी आभार मानले.

…तर मीदेखील भगवे कपडे घातले असते
आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी थडी उद्घाटनप्रसंगी भगव्या रंगाचे कपडे आणि टोपी परिधान केली होती. बैलगाडा शर्यतीच्या वेळी आमदार लांडगे यांच्यासारखाच पेहराव उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी करण्यात आला होता. त्यामुळे आजही आमदार लांडगे यांनी माझ्यासाठी भगव्या रंगाचे कपडे शिवले असते, तर मी भगवे कपडे घातले असते, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली असता हशा पिकला.

Back to top button