पिंपरी : दिव्यांगांचा मोफत प्रवास निधी ‘पीएमपी’च्या घशात

पिंपरी : दिव्यांगांचा मोफत प्रवास निधी ‘पीएमपी’च्या घशात

राहुल हातोले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका राज्य शासनाच्या नगर विकास खात्याच्या आदेशानुसार दिव्यांग कल्याण निधीमधून अनेक योजना राबविते. या योजनेतील दिव्यांगांसाठी पीएमपीचा मोफत प्रवास योजनेचा लाभ शहरातील मोजकेच दिव्यांग व्यक्ती घेत आहेत; मात्र या योजनेचा सरसकट निधी महापालिकडून पीएमपीला दिला जात असल्याची तक्रार काही दिव्यांग संघटनांकडून होत असून, दिव्यांगांसाठी स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणावी, अशी मागणी होत आहे.

कोरोना काळात दिव्यांगांना मी नावाचे स्मार्ट कार्ड देण्यात आले. त्यानुसार, प्रत्येक कार्ड स्वॅप केले जात असून, प्रत्येक दिव्यांग प्रवाशाची नोंद ठेवली जात होती. त्यावरून प्रवास केलेल्या दिव्यांगाची आकडेवारी ठेवणे सोपे झाले होते. मात्र, हे कार्ड बंद करण्यात आले आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच दिव्यांगांच्या ठरलेल्या आकडेवारीनुसार महापालिका पीएमपीच्या खात्यावर वार्षिक निधी पाठवणे सुरू झाले.

यामध्ये ज्या दिव्यांगांनी प्रवास केला नाही, त्यांचादेखील प्रवास ग्राह्य धरून निधी दिला जातो. ही एकप्रकारची महापालिकेच्या पैशाची लूटच असल्याचे दिसून येते. पीएमपीने प्रवास न करता सरसकट सर्व दिव्यांगांच्या नावाने वर्षभराचा निधी महापालिकेच्या वतीने पीएमपीला पाठविला जातो. त्यापेक्षा दिव्यांगांच्या खात्यावर प्रवास भत्ता देण्यात यावा. अशी मागणी दिव्यांगांकडून होत आहे.

गेल्या तीन वर्षात महापालिकेने पीएमपीला दिलेला निधी
वर्ष लाभार्थी रक्कम
……………………………………………………………….
2020-21 2197 02,04,10,854
……………………………………………………………….
2021-22 2321 03,15,84,199
……………………………………………………………….
2022-23 2565 04,22,91,085
………………………………………………………………..

वरील आकडेवारीचा विचार करता सरासरी प्रत्येक दिव्यांगामागे वर्षाला महापालिकेला द्यावा लागणारा निधी
सरासरी वर्षाकाठी : 16,500 रुपये
सरासरी महिन्याला :1400 रुपये

या वर्षीच्या दिव्यांगांच्या आकडेवारीनुसार 2565 दिव्यांगांपैकी चाळीस टक्क्यानुसार 1539 दिव्यांग व्यक्ती पीएमपी प्रवासाचा लाभ घेतात. मात्र, या व्यक्तीदेखील पीएमपीने दररोज प्रवास करीत असण्याची शक्यता कमी आहे. कोरोना काळात वाहकाकडील मशीनद्वारे दिव्यांगाजवळील कार्ड स्वॅप केले जात होते. त्यानुसार, पीएमपीकडे याबाबत नोंद राहत होती. आता मात्र सरसकट हा निधी पीएमपीच्या घशात जात आहे.

महापालिकेच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र यामध्ये सुधारणांसाठी दिव्यांगांच्या मागण्यांचा विचार केला जाणार आहे.

                                             – श्रीनिवास दांगट, सहायक आयुक्त,
                                                   महापालिका दिव्यांग कक्ष.

पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बसमध्ये चढणे-उतरणे शारीरिक मर्यादेमुळे अडचणीचे असते. त्यामुळे दिव्यांग पासधारकांपैकी पन्नास ते सत्तर टक्के दिव्यांग बसप्रवासच करत नाहीत. तरीदेखील त्यांच्या पासच्या मोबदल्यात वर्षभराचे हजारो रुपये पालिका पीएमपीला देते.ज्या दिव्यांगांना बसप्रवास करता येत नाही, त्यांच्यासाठी प्रवासभत्ता योजना राबविण्यात यावी.
                                                     -हरिदास शिंदे, अध्यक्ष,
                                        संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news