चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : जगताप यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत दुमत नाही : पालकमंत्री पाटील | पुढारी

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : जगताप यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याबाबत दुमत नाही : पालकमंत्री पाटील

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबात पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. तथापि, उमेदवार कोण असावा, हे प्रदेश कार्यकारिणी निश्चित करेल. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत, असे सूतोवाच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 25) केले.
राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही.

ही बाब लक्षात घेऊन चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे पूर्वतयारी बैठक घेण्यात आल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीची माहिती पाटील यांनी पत्रकारांना दिली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, अश्विनी जगताप, शंकर जगताप, सचिन पटवर्धन, सदाशिव खाडे, अमोल थोरात, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे आदी या प्रसंगी उपस्थित होते.

चिंचवडचा उमेदवार अद्याप गुलदस्तात
पाटील म्हणाले, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरविण्यासाठी ही बैठक नव्हती. उमेदवारी ठरविण्याची प्रक्रिया भाजपमध्ये ठरलेली आहे. राजकारणात काम करताना इच्छुक असणे स्वाभाविक आहे. तो काही गुन्हा नाही. आमदार महेश लांडगे इच्छुकांशी बोलतील. इच्छा, आग्रह व्यक्त करण्याची ही वेळ नाही.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची नावे प्रदेशकडे पाठविली जातील. प्रदेशची कमिटी नावे निश्चित करेल आणि दिल्लीतून उमेदवाराचे नाव जाहीर होईल. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. बूथनिहाय आढावा घेण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी कमी मते पडलेल्या बूथची माहिती घेतली आहे. दरम्यान, आता भाजपमध्ये दिवंगत आमदार जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप की बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न
चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सर्वांना पत्रे दिली जातील. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यासाठी भेट घेणार आहे. राजकारण मिनिटामिनिटाला बदलत असते, असेही पाटील यांनी नमूद केले. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे आमचे नेते होते. लोकांसाठी ते आधार होते. त्यांच्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. त्यामुळे ही निवडणूक पक्षासाठी कठीण नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी : शंकर जगताप
भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, पोटनिवडणुकीला कसे सामोरे जायचे, याबाबत पालकमंत्री पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. उमेदवारीबाबत अजून काहीही ठरलेले नाही. लक्ष्मणभाऊ आजारी असतानाही पक्षनिष्ठेसाठी राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणूक मतदानासाठी गेले होते. त्यामुळे जगताप कुटुंबीय हे पक्षनिष्ठच आहे. अद्याप कुटुंबीय दुःखातून सावरलेले नाही. पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहोत.

Back to top button