पुणे : निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन; शनिवार पासून प्रारंभ | पुढारी

पुणे : निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन; शनिवार पासून प्रारंभ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शाहू लक्ष्मी कला-क्रीडा अकादमीच्या वतीने नामदार चंद्रकांत पाटील चषक निमंत्रित राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अकादमीच्या प्रा. अनुराधा येडके, अभिजित भोसले आणि रवींद्र पेठे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. महाराष्ट्र राज्य हौशी मल्लखांब संघटनेची मान्यता असलेली ही स्पर्धा 28 व 29 जानेवारी रोजी पटवर्धन बाग येथील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानासमोरील मैदानावर होणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मल्लखांब संघटनेचे सहकार्य लाभणार आहे.

दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यांतील संस्थांनी सहभाग नोंदवला असून, 700 ते 750 खेळाडू आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहेत. ही स्पर्धा 14 वर्षांखालील मुले-मुली, 16 वर्षांखालील मुले- मुली, 18 वर्षांखालील मुले – मुली या वयोगटामध्ये होणार आहेत. या विशेष प्रकारामध्ये वय वर्षे 30 पासून ते 80 वर्षांच्या खेळाडू व प्रशिक्षकांनी सहभाग नोंदवला आहे.

वरिष्ठ गटामध्ये होणार्‍या या स्पर्धांमध्ये महिलांसाठी 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 वर्षांवरील असा वयोगट असेल, तर पुरुषांमध्ये 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 वर्षांवरील असे वयोगट असणार आहेत. यामध्ये महिलांसाठी दोरीचा, तर पुरुषांसाठी पुरलेला मल्लखांब अशी साधने असतील. स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील असणार आहेत.

दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी(दि. 28) सकाळी 7.30 वाजता मध्य प्रदेशचे मल्लखांब द्रोणाचार्य पुरस्कार विजेते योगेश मालविय आणि भारतीय मल्लखांब महासंघाचे सचिव धरम वीर सिंग यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते सागर ओव्हाळकर, जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, क्रीडा उपसंचालक अरुण पाटील, एशियन मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजीव जालनापूरकर, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र अधिकारी, जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष सचिन पुरोहित यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Back to top button