पुणे : पाकळ्यातून साकारणार पं. भीमसेन जोशी, लतादीदी | पुढारी

पुणे : पाकळ्यातून साकारणार पं. भीमसेन जोशी, लतादीदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेवंती, गुलाब, लाइट पिंक, पांढरा गुलाब, रेड क्रीमसन अशी नावे… रूपही असे की, पाहतच बसावे असे वाटावे, असे अनोखे पुष्पप्रदर्शन पुणेकरांसाठी भरवण्यात आले आहे. आपल्या बहुरंगी छटांनी बहरणारे पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन विविध फुलांसह फळांच्या वृक्षांनी सजले आहे. 29 जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या पुष्पप्रदर्शनात पाकळ्यांचा वापर करुन भारतरत्न पं.भीमसेन जोशी, लतादीदी यांचे पोट्रेट गुरुवारी साकारले जाणार आहे.

बुधवारी (दि. 25) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, विश्वस्त अनुपमा बर्वे, श्रीनाथ कवडे, सुमन किर्लोस्कर, प्रशांत काळे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विविध फुले, भाजीपाला, बोन्साय अशा स्पर्धाही ठेवण्यात आल्या आहेत. जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार असून, फुलांची सजावट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी झाली होती.

या पुष्पप्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. गुलाबापासून ते शोभेच्या झाडांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना व बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार तसेच स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस उतरणार असल्याने 26 जानेवारी रोजी मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या पुष्पप्रदर्शनात अगदी गच्चीवर बाग सजवू पाहणार्‍या निसर्गप्रेमींसाठी कुंडीत फळबाग करता येऊ शकेल अशी झाडे व फळझाडे ठेवण्यात आली आहेत. याशिवाय बागेतील शोभिवंत झाडे व औषधोपयोगी ठरणारी रोपेदेखील ठेवण्यात आली आहेत.

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे 1000 विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा घेण्यात आली.

गुलाबांचे विविध प्रकार
फुलांचा राजा म्हणून सर्वांना आकर्षित करणार्‍या गुलाबाची विविध रूपे प्रदर्शनात पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे ‘किंग ऑफ द शो’ आणि ‘क्वीन ऑफ द शो’ असे दोन गुलाब सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. एका छताखाली गुलाबाची अनेक रूपे व रंग पाहण्याची संधी पुणेकरांना करून देण्यात आली आहे.

अनोख्या कलेचे होणार दर्शन
पुण्यातील एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन पुष्पप्रदर्शनात व्यवसायाने वकील असलेल्या चारुचंद्रा भिडे ह्या गुरुवारी (दि. 26) आपल्या अनोख्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. ती कला म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे पोट्रेट फुलांच्या पाकळ्यांतून साकारणार आहेत. या पोट्रेटचे वैशिष्ट्य म्हणजे हे तयार झाल्यानंतर मोबाईलमधून पाहिल्यानंतर अगदी सहज दिसते. सकाळी 8 वाजता 3 बाय 4 च्या बोर्डवर पोट्रेट तयार करण्यात येणार असून, पुणेकरांना थेट पाहण्याची संधी मिळणार आहे.

Back to top button