

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्ती नाही. ही तर शिवशक्ती आणि वंचित शक्ती आहे, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पुण्यात केला.
पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे हयात असताना आम्ही त्यांच्यासोबत युती केली होती.
तीच खरी शिवशक्ती दरम्यान, कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र, निवडणूक झाल्यास भाजपला पाठिंबा असल्याचे आठवले यांनी या वेळी जाहीर केले. भाजपकडून मित्रपक्षांचा उल्लेख करताना रिपाइंचे नाव घेतले जात नाही. वास्तविक रिपाइं राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आल्यानंतरच युतीची महायुती झाली आहे. त्यामुळे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी बोलणार आहे.
रिपाइंचे मे महिन्यात राज्य अधिवेशन
रिपाइंचे (आठवले गट) नुकतेच महाबळेश्वर येथे अभ्यास शिबिर पार पडले. आता 10 मे रोजी शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आठवले यांनी यावेळी दिली.