Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी घातपाताचा कट उधळला | पुढारी

Pune : पुणे लोहमार्ग पोलिसांनी घातपाताचा कट उधळला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संशयास्पद जाणाऱ्या एका प्रवाशाला लोहमार्ग पोलिसांनी पुणे रेल्वे स्टेशनवर पकडले. त्याच्याकडून परदेशी बनावटीचे पिस्तुल, ६ काडतुसे याच्यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अनिलकुमार रामयग्य उपाध्याय (वय ४७, रा. सुरत, गुजरात) असे त्याचे नाव आहे. त्याने त्याच्याजवळ पिस्तूल कोणत्या कारणासाठी बाळगले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार निशिकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबतची माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस पुणे रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त करीत असताना एक जण घाईघाईत प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन संशयास्पदरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्याच्या कोटाच्या खिशात मेड इन इग्लंडचे विदेशी बनावटीचे एक पिस्तुल व ६ काडतुसे आढळून आली. त्याच्या गळ्यात सोनसाखळी, त्यात सूर्याचे आकाराचे व सूर्याचे चित्र असलेले पेंडण सापडले. ब्रेसलेट, लॅपटॉप असा ३ लाख ५५ हजार ३९० रुपयांचा ऐवज आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे. आपण कपड्याचे व्यापारी असल्याचा त्याने दावा केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तुल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगत आहे. तो नागपूरला जात होता.

संशयित आरोपी नागपूरकडे जात आसल्याची माहिती

दरम्यान अंधश्रद्धा विरोधी काम करणारे श्याम मानव यांनी धीरेंद्र महाराज यांना चमत्काराचे आव्हान दिल्यानंतर मानव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या ८ दिवसांपासून नागपूरमध्ये वाद सुरु आहे. श्याम मानव यांनी तशी पोलिसांकडे तक्रारही दिली होती. त्यामुळे त्यांना धमक्याही आल्या होत्या. अटक करण्यात आलेला संशयित आरोपी अनिलकुमार हा नागपूरकडे निघाल्याचा संशय आहे. श्याम मानव यांना ज्या धमक्या आल्या, त्याबाबत लोहमार्ग पोलीस त्याच्याकडे चौकशी करत आहेत. तो खरंच शाम मानव यांना जीवे मारण्यासाठी आला होता का? याचा कट शिजला होता का? त्याला कोणी पाठवले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस कोठडीत अनिलकुमार यांच्याकडून मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत लोहमार्ग पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे चौकशी करता त्यांनी यावर अधिक काही बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा

Back to top button