चिंचवड पोटनिवडणुक: राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, ही जागा शिवसेनेने.. | पुढारी

चिंचवड पोटनिवडणुक: राऊतांचं सूचक विधान; म्हणाले, ही जागा शिवसेनेने..

पुढारी ऑनलाईन: पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकीसाठी 2५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार ३१ जानेवारीपासून या दोन ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपकडून या दोन्ही मतदार संघातून कुणाला उमेदवारी याचा निर्णय आज सांयकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. तर या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सांगितले. तर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या पोटनिवडणुकीबाबत भाष्य केले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ ठाकरे गट लढण्याच्या तयारीत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर कसबा पोटनिवडणुक ही महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ते बुधवारी मुबंईत माध्यमांशी बोलत होते.

भाजपकडून अंधेरी पोटनिवडणुकीत ज्याप्रमाणे महाराष्ट्राची परंपरा जपली त्याप्रमाणे कसबा आणि पिंपरीमध्ये महाविकास आघाडीने संस्कृती जपावी, अशी मागणी केली जात आहे. यामुळे या दोन्ही मतदारसंघातून महाविकास आघाडी उमेदवार देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना खासदार संजय राऊतांनी सूचक विधान केलं आहे.

निधन झालेल्या आमदाराच्या जागेवर जर त्यांच्या कुटुंबीयातील उमेदवार पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. परंतु,अंधेरीची निवडणूक ही बिनविरोध झाली नाही. तेथे निवडणूक झाली. भाजपने ही निवडणूक लढवली नाही कारण त्यांना जिंकण्याची संधी नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.

मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे मातोश्रीवर आले होते.या निवडणुकीत काय पावलं टाकायची, कोणता निर्णय घ्यायचा यावर चर्चा झाली आहे. उद्या किंवा परवा पुन्हा चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. जर निवडणूक लढवली गेली तर चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी असं आमचं मत आहे. कसबा पेठसाठी राष्ट्रवादी-काँग्रस यांच्यात चर्चा होईल, अशा प्रकारचीही चर्चा झाली आहे, यावर निर्णय होईल, असं राऊत म्हणाले.

Back to top button