चिंचवड पोटनिवडणुकीबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या येत्या दोन- तीन दिवसांत… | पुढारी

चिंचवड पोटनिवडणुकीबाबत खासदार सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या येत्या दोन- तीन दिवसांत...

पुढारी ऑनलाईन: चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीकडून येत्या दोन दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकतं, असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलं. परंतु,बिनवि रोध निवडणुकीवरून मी कोणतेही तर्कवितर्क लावू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्या आज पुण्यात बोलत होत्या.

पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीची बैठक सुरु आहे. त्यातून सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसच्या काही नेत्यांची उपस्थिती होती. दोन्ही पोटनिवडणुकीसंदर्भात अनेक भेटीगाठी सुरु आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत पोटनिवडणुकीबाबत सर्व चित्र स्पष्ट होईल, असंही सुळे म्हणाल्या.

महाविकासआघाडी सरकारने मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट केलं होतं, असा दावा फडणवीसांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात करत खळबळ उडवून दिली होती. त्यावर सुप्रिया सुळें म्हणाल्या की, “आप से ये उम्मिद न थी”. या सर्व खोट्या गोष्टी पसरवण्यापेक्षा फडणवीसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेवर काम करावं. राज्यातील अनेक गुन्ह्यांबाबत चर्चा करायला हवी होती. त्यासोबतच त्यांनी वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण कसं कमी करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंग सक्रिय आहे. त्यांनी त्यावर तोडगा काढायला हवा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यातील हिंजवडीमध्ये स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या होत्या. त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीची पाहणी करत स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्याला ज्या परिसरात मोठ्या मोठ्या इमारती दिसत आहेत, त्याच ठिकाणी स्ट्रॉबेरीची शेतीदेखील होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याशिवाय शेतीसोबतच असलेलं नातं जपण्यात येत आहे. ही एक चांगली बाब आहे. आयटी आणि शेती हीच महाराष्ट्राची खास ओळख आहे. सध्या लोकसंख्या वाढत आहे. त्याबरोबरीने शहरांचादेखील विकास होत आहे. यामुळे शेतजमीन ही जगात, देशात आणि राज्यात कमी होत आहे. त्यामुळे आपण असे अनेक अनोखे प्रयोग होणं गरजेचं आहे. या प्रयोगांना सर्वांनी प्रोत्साहनदेखील दिलं पाहिजे,असंही त्या म्हणाल्या.

Back to top button