बारामती शहरातील रस्त्यांची चाळण; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण | पुढारी

बारामती शहरातील रस्त्यांची चाळण; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शहरातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. कित्येक महिन्यांपासून रस्त्यांची दुरुस्ती रखडल्याने वाहनचालक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. वारंवार होणारी कामे, खोदाई आणि निकृष्ट कामांमुळे रस्ते खराब झाले आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. भिगवण रस्ता सोडला, तर बहुतांश ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिकेअंतर्गत येणार्‍या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
वारंवार खोदाई होत असल्याने नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

खोदून ठेवलेल्या चार्‍या, खड्डे खोदून ते न भरणे, खड्डे तात्पुरते भरणे, डांबर न टाकताच मुरुमीकरण करणे, यामुळे रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत आहेत. शहराबाहेरून जाणारे रिंगरोड, बायपास रस्ते, शहरांतर्गत येणारे रस्ते या ठिकाणी मोठे खड्डे पडूनही दुरुस्ती झालेली नाही. तसेच, विनाकारण टाकलेल्या गतिरोधकांमुळे बारामतीकर हैराण झाले आहेत.

एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या विकासासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असताना प्रशासनाच्या असहकार्य भूमिकेमुळे बारामतीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम ते एसटी स्टँडकडे जाणार्‍या रस्त्यावरही असेच खड्डे पडले आहेत. भिगवण रस्त्यावरील सेवा रस्त्यांवरही अशीच परिस्थिती आहे.

या रस्त्यांची दुरवस्था
भिगवण व इंदापूर चौकातील रस्ते, खिश्चन कॉलनी ते सातव चौक, सातव चौक ते तांदूळवाडी रस्ता, नेवसे रस्ता ते दुर्गा टॉकीज रस्ता, सुभाष चौक ते जुनी कचेरी रस्ता, तीन हत्ती चौक परिसर, न्यायालय ते हॉटेल सिटी इन, कोष्टी गल्ली ते तांदूळवाडी वेस चौक, वसंतनगर, बुरुड गल्ली, स्टेडियम रस्ता, शहरातील मुख्य चौक व अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

Back to top button