जमीन देण्याच्या आमिषाने धरणग्रस्तांची फसवणूक; मंचर येथे दोघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

जमीन देण्याच्या आमिषाने धरणग्रस्तांची फसवणूक; मंचर येथे दोघांविरोधात गुन्हा दाखल

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी यांच्या नावावर असलेली जमीन धरणग्रस्त यांना मिळणार आहे. ती जमीन खरेदी करून मी तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून जवळे येथील शेतकर्‍याची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळे (ता. आंबेगाव) येथील शेतकरी महेश चंद्रकांत लोखंडे (वय 38) यांना भरत ज्ञानेश्वर नाईक (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) व शिवाजी वामन इंदोरे (रा. चांडोली, ता. आंबेगाव) यांनी सन 2015 मध्ये जिल्हाधिकारी यांच्या नावावर असलेली जमीन गट नंबर 593/2, 593/3 ही जमीन धरणग्रस्तंना मिळणार असून ते धरणग्रस्त माझ्या ओळखीचे आहेत.

त्यांच्याकडून ती जमीन खरेदीखत करून, मी तुमच्या नावावर करून देतो, असे सांगून नोटरी करून लोखंडे यांच्याकडून वेळोवेळी 10 लाख 59 हजार रुपये घेतले. त्यानंतर जमीन नावाने न झाल्याने लोखंडे यांनी पैसे परत मागितले असता त्यातील 6 लाख रुपये परत दिले. मात्र, उर्वरित साडेचार लाख रुपयांची वारंवार मागणी केली असता ते परत न दिल्याने शेतकरी महेश लोखंडे यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत शेतकरी महेश लोखंडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा तपास मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान हगवणे करीत आहेत.

Back to top button