सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा; दोन दिवसांमध्ये तब्बल 72 विद्यार्थी पडले आजारी | पुढारी

सतर्कतेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा; दोन दिवसांमध्ये तब्बल 72 विद्यार्थी पडले आजारी

महाळुंगे पडवळ(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : साकोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील 72 विद्यार्थी थंडी, ताप, खोकला, सर्दीने आजारी पडले आहेत. वातावरणातील बदल व व्हायरल इन्फेक्शनमुळे ही मुले आजारी पडली असावीत, असा अंदाज तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार यांनी व्यक्त करीत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आले.

साकोरे येथे शुक्रवारी (दि. 20) दुपारी सुमारे 40 मुले थंडी-तापाने शाळेत आजारी पडली, तर शनिवारी (दि. 21) अनेक मुले शाळेत आलीच नाहीत. या दोन दिवसांत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण 72 विद्यार्थ्यांना अचानक थंडी, सर्दी, खोकला, तापासारखे आजार झाले. अचानक मुले आजारी पडल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. रविवारी (दि. 22) उपसरपंच श्रुतिका गणेश गाडे यांनी ही माहिती उजेडात आणली.

चास (ता. आंबेगाव) येथील प्राथमिक उपकेंद्रात भेटीसाठी आलेले डॉ. तुषार पवार यांना ही माहिती समजतात त्यांनी गावातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात जाऊन तपासणी सुरू केली. या तत्परतेमुळे सुमारे 72 विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, असे पालकांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र साकोरे येथील डॉक्टरांनी रविवारी सुटी असताना देखील युद्धपातळीवर सर्व मुलांची भेट घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करीत उपचार केले. आता सर्व मुले उपचार घेऊन पूर्णपणे बरी होत असून, धोका टळल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच आंबेगावच्या गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत येथे भेट देऊन माहिती घेतली. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार पवार, विस्तार अधिकारी सुरेश लवांडे, अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांना योग्य त्या सूचना केल्या.

या वेळी सरपंच साकोरे, डॉ. जयसिंग मिरपगार, डॉ. संतोष बलकर, आरोग्य निरीक्षक भास्कर साबळे, दत्तात्रय भागवत, आरोग्यसेविका अनिता वाघुले, आरोग्यसेवक प्रदीप पडवळ, बाबाजी कडूसकर, पूनम बिडकर, आशावर्कर कीर्ती मोढवे, अर्चना मोढवे आदी
उपस्थित होते.

Back to top button