

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मोठमोठ्या कारखान्यात व इतरत्र पॅकिंगसाठी प्लास्टिकपासून बनविलेल्या चिकटपट्टीचा वापर केला जातो. जे पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. यावर एक नामी उपाय एका महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी शोधला आहे. उसाच्या वाळलेल्या पाल्यापासून चिकटपट्टीची निर्मिती केली आहे. जेणेकरून पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लागणार आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य विज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश धरणे व प्रमिला जोगदंड यांना ही अभिनव कल्पना सुचली आहे आणि त्याचे पेटंटदेखील तयार केले आहे. जेव्हा ऊसतोडीनंतर वाळलेला पाला व पाचट शिल्लक राहतात व नंतर शेतकरी ते पेटवतो किंवा जाळतो त्यामुळे जमिनीत असणारे नैसर्गिक घटक, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम नष्ट होतात. तसेच आगीमुळे जमिनीत असणारे सूक्ष्मजीव मरतात, त्यामुळे जमिनीची धूप होऊन पोत कमी होतो.
तसेच प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते, कार्बनडाय ऑक्साइडची पातळी वाढते, तसेच नैसर्गिक जैवविविधता नष्ट होते. यावर आता बंदी घालण्यात आली आहे. मग, या पाल्याचे काय करायचे हा विचार डॉ. धरणे यांच्या मनात आला. बॉक्स पॅकिंगसाठी (भेटवस्तू, मिठाई, कपडे आणि इतर) हलक्या वस्तूंसाठी वेगवेगळे चिकट टेप वापरतो. परंतु हा चिकट टेप केमिकल, प्लास्टिक आणि इतर अपायकारक घटकांपासून बनवलेला असतो. तो पुन्हा वापरता येत नाही आणि त्याचा विनाशदेखील होत नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होते. आपण उसाच्या वाळलेल्या पाल्यापासून बॉक्स पॅकिंगची निर्मिती करू शकतो ही कल्पना सुचली.
आपण हा वाळलेला पाला न जाळता त्यापासून बॉक्स पॅकिंग केली तर त्यामुळे पाचट जाळल्यामुळे होणारे नुकसान किंवा हानी टाळता येऊ शकते. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी किंवा नुकसान टाळू शकतो आणि आपण पर्यावरणाचे रक्षणदेखील करू शकतो शिवाय शेतकर्यांना उसाच्या पाल्यापासून जास्तीचे उत्पन्नदेखील मिळेल. हा दृष्टीने उसाच्या वाळलेल्या पाल्यापासून बॉक्स पॅकिंगची निर्मिती केली आहे.