राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग; चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हे | पुढारी

राजकीय पक्षांकडून हालचालींना वेग; चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याची चिन्हे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होणार, असा विश्वास भाजपकडून व्यक्त केला जात होता; मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व आम आदमी पार्टी या पक्षाच्या ठाम भूमिकेमुळे निवडणूक होणार असे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांतच राजकीय घडामोडींना वेग येऊन उमेदवार जाहीर होतील, अशी शक्यता आहे. तोपर्यंत राजकीय गणिते कशी बदलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारीला निधन झाले.

त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. त्याची घोषणा 18 जानेवारीला झाली. ती निवडणूक बिनविरोध होईल, असा भाजपला विश्वास होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी जागा न सोडता, निवडणूक लढण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी उमेदवार देणार, असे स्पष्ट केले आहे.

तसेच, काँग्रेस, शिवसेना व आपनेही निवडणुकीत उतरण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. स्थानिक तसेच, वरिष्ठ पातळीवर विचार मंथन सुरू आहे. इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार रिंगणात उतरणार असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. परिणामी, बिनविरोध निवडणूक होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.

उमेदवारीअर्ज भरण्यास मंगळवारपासून सुरुवात
उमेदवारीअर्ज मंगळवार (दि. 31) ते 7 फेब्रुवारी असे 8 दिवस भरता येणार आहेत. अर्ज माघारी घेण्याचा दिवस 10 फेब—ुवारी आहे. प्रचारासाठी 15 दिवसांचा कालावधी आहे. तर, 27 फेब्रुवारीला मतदार होणार आहे. दोन मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

एकूण 510 मतदान केंद्रे
चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 3 लाख 1 हजार 648 आणि महिला मतदार 2 लाख 64 हजार 732 आहेत. तर, तृतीयपंथी मतदार 35 आहेत. तर, एकूण 510 मतदार केंद्र असणार आहेत.

मागील निवडणुकीतील स्थिती
सन 2019

लक्ष्मण जगताप (भाजप) – 1 लाख 50 हजार 723
राहुल कलाटे (अपक्ष) – 1 लाख 12 हजार 225
नोटा – 5 हजार 874

सन 2014

लक्ष्मण जगताप (भाजप) – 1 लाख 23 हजार 786
राहुल कलाटे (शिवसेना) – 63 हजार 489
नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – 42 हजार 553
कैलास कदम (काँग्रेस) – 8 हजार 643
अनंत कोर्‍हाळे (मनसे) – 8 हजार 217
मोरेश्वर भोंडवे (अपक्ष) – 13 हजार 952
नोटा – 3 हजार 203

सन 2009

लक्ष्मण जगताप (अपक्ष) – 78 हजार 741
श्रीरंग बारणे (शिवसेना) – 72 हजार 166
भाऊसाहेब भोईर (काँग्रेस) – 24 हजार 684
विलास नांदगुडे (अपक्ष) – 15 हजार 561

Back to top button