पहिल्या दलित स्त्री लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन | पुढारी

पहिल्या दलित स्त्री लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन

पुणे : पहिल्या दलित स्त्री लेखिका तसेच ज्येठ आंबेडकरवादी साहित्यिक शान्ताबाई कांबळे वय (101) यांचे वृद्धापकाळाने २५ जानेवारीला सकाळी 7 वाजता पुण्यात निधन झाले. त्या शेवटच्या काळात पुण्यात आपल्या मुलीकडे राहत होत्या. त्यांच्यावर शेवटचे अंत्यसंस्कार कोपरखैरणे येथे बौद्ध धर्माच्या पद्धतींने होतील. दलित पँथर चे अध्यक्ष दिवंगत प्रा.अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या.

शांताबाई कांबळे या दलित स्त्री लेखिका, शिक्षिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात महुद बुद्रुक या गावी झाला. ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ या पुस्तकावर आधारित नाजुका या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती. शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे. त्यांच्या पुस्तकाचे अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले आहे.

माज्या जल्माची चित्तरकथा हे त्याचं आत्मवृत्त विशेष गाजलं. पहिल्यांदा मार्च १९८३ साली ते पूर्वा मासिकात आलं. त्या आधी साहित्य संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांनी या पुस्तकाला १९८२ आली अनुदान दिले आणि ते पूर्वा प्रकाशनातर्फे १७ जून १९८६ रोजी पुस्तक रूपात आलं.

शांताबाई यांचा जन्म १ मार्च १९२३ रोजी मु. पो. आटपाडी, जि. सांगली येथे झाला. शिक्षिका म्हणून सोलापूर जिल्हा स्कूल बोर्डात त्यांची १६ जानेवारी १९४२ रोजी नियुक्ती झाली. त्या जिल्ह्यातील पहिल्या दलित शिक्षिका ठरल्या. १९५२ मध्ये पुण्याच्या विमेन्स कॉलेजमधून ट्रेनिंग कॉलेज वर्ष दुसरे वर्ष त्या उत्तीर्ण झाल्या. काही काळ सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून त्यांनी काम केले.

२८ फेब्रुवारी १९८१ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर मराठी वाङ्मयातील दलित स्त्रीचे पहिलेच आत्मकथन त्यांनी लिहिले. ‘नाजुका’ या नावाने मुंबई दूरदर्शनवर मालिकेच्या स्वरूपात १० ऑगस्ट १९९० पासून हे आत्माकथन सादर झाले. याचे फ्रेंच, इंग्रजी, हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. ‘फेमिना’ मासिकाच्या काही अंकांतून इंग्रजीत अनुवादित झाले.

अंत्यविधी आज संध्याकाळी ७ वा. कोपरखैरणे येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे.अंत्यविधीस रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले व चळवळीतले नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Back to top button