महत्वाची बातमी : दगडूशेठ गणपतीला जाताय? आज शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद; पर्यायी मार्ग वापरा | पुढारी

महत्वाची बातमी : दगडूशेठ गणपतीला जाताय? आज शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद; पर्यायी मार्ग वापरा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बुधवारी (दि. 25) बदल करण्यात येणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची होणारी गर्दी विचारात घेऊन शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.
शिवाजीनगर भागातील स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे चौक) शिवाजी रस्त्याकडे जाणारी जड वाहतूक (पीएमपी बससेवा) बंद करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी सहानंतर रात्री गर्दी कमी होईपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल असणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. श्री गणेश जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीचे आयोजन केले आहे. बुधवारी सायंकाळी मानाच्या मंडळांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे बाजीराव रस्त्याने महापालिकेकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी पूरम चौकातून टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, खंडोजीबाबा चौक या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. मध्यभागातील वाहतुकीची परिस्थिती विचारात घेऊन शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, गणेश रस्ता, लक्ष्मी रस्ता, तसेच अन्य मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.

…असा आहे वाहतूक बदल
स. गो. बर्वे चौकातून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्‍या पीएमपी बस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला चित्रपटगृहासमोरून खुडे चौक, बालगंधर्व चौक, जंगली महाराज रस्ता, अलका चित्रपटगृह या मार्गाने इच्छितस्थळी जातील. पुणे स्टेशनकडे जाणार्‍या पीएमपी बस मंगल चित्रपटगृहामार्गे कुंभारवेस चौकातून वळून मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकमार्गे जातील. कोथरूडकडून अप्पा बळवंत चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जाणार्‍या बस बाजीराव रस्ता, गाडगीळ पुतळा चौकातून उजवीकडे वळून कुंभारवेस चौकमार्गे पुणे स्टेशनकडे जातील. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्त्याने इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौक, बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

Back to top button